हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. २५ जानेवारी हा दिवस युवा मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्तानं तेव्हा नि आताही निवडणुकांच्या अनुषंगानं युवा मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागृती व्हावी यासाठी अनेक कार्यक्रम आयोजण्यात आलेत. ‘आम्हाला देशाची प्रगती साधत आमचं भविष्य घडवायचंय, त्यामुळं मतदानाचा हक्क आम्ही बजावणारच..’ असा निर्धार युवा मतदारांनी केलाय. सध्या तरुणाईवर नरेद्र मोदींपाठोपाठ राहुल गांधी, अरिवद केजरीवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा प्रभाव आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाबद्दल तरुणांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्याखेरीज कुटुंब, मित्रमंडळी, सहकारी, उमेदवाराचं काम, पक्ष, मीडिया या बाबींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाईच्या मते शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, शासन यंत्रणेतील पारदर्शकता, जलदगती न्याय व्यवस्था, स्त्रिायांचं सक्षमीकरण नि सुरक्षा, पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवं. भ्रष्टाचार मुळासकट उखडणं शक्य नसलं, तरी तो कमी करता येईल, असा विचारही मांडला गेला. प्रथमच उपलब्ध होणारा नकाराधिकार आणि भविष्यात होऊ घातलेल्या ऑनलाइन मतदानाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू विचारात घेतल्या गेल्या. याच मुद्दय़ांवर चर्चा करत ‘बदल एका मतानेही घडतो’, असं ठामपणं सांगत काही जणांनी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली.

अक्षता जोशी
उमेदवारानं सर्वसमावेशक होत प्रत्येकाचा विचार करावा. केवळ विकासकामांपुरतं मर्यादित न राहता लोकांचा माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न करावा. व्यवस्थेतील बऱ्याच गोष्टींत बदल हवाय. कृषिक्षेत्र नि गृहसंकुलांना शुद्ध पाणीपुरवठा करणं, पाणीप्रश्न नि ग्लोबल वॉìमगविषयी लोकांना सजग करून त्यादृष्टीनं उपाय योजायला हवेत. सोशल साइट्सचा फारसा प्रभाव पडत नाही. उमेदवारांच्या कामावर ते अवलंबून असतं. मित्र नि सहकाऱ्यांसोबतच्या चच्रेचा खूप प्रभाव पडतो. ऑनलाइन मतदान झालं तर चांगलं आहे. पण खेडोपाडी वीज पोहचलेली नसल्यानं तिथं ही सोय कशी उपलब्ध होणार, याचा विचार व्हावा. हा प्रोग्रॅम व्यवस्थित सिक्युअर केल्यास हॅकिंग नि हँग होण्याचे प्रकार टाळता येतील. ऑनलाइन मतदानामुळं ट्रान्स्परन्सी वाढेल. ७० टक्के लोक आहेत त्यातलेच उमेदवार निवडतील. उरलेल्यांपकी काही नकाराधिकाराचा वापर करतील. त्यामुळं कदाचित गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. मग परत निवडणूक घ्यावी लागेल.

अनघा मोडक
सगळ्याच उमेदवारांची प्रतिमा स्वच्छ असेल असं गृहीत धरणं योग्य नाही. त्यांची तुलना करून तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचं काम समाजपूरक ठरणार का हा विचार करावा. व्यवस्थेत बदल हवाच आहे. एका दिवसात सगळे बदल शक्य नाहीत. व्यवस्थेतले दोष-उणिवा समजून घ्यायला हव्यात. पायाभूत सुविधांविषयी सखोल माहिती करून घ्यायला हवी. आíथक सुशिक्षितता निर्माण करायला हवी. वुमन इम्पॉवरमेंटचा विचार करताना स्त्रीचा माणूस म्हणून विचार होणं गरजेचं आहे. आपणही व्यवस्थेतील जबाबदार नागरिक म्हणून मतदान करावं. सोशल मीडिया काही गटांपर्यंत मर्यादित आहे. त्यात तरुणांची संख्या अधिक असल्यानं त्याचा परिणाम तरुणांवर पडू शकतो. त्याखेरीज मतासाठी देण्यात येणाऱ्या पशांचा प्रभावही पडू शकतो. एखादी विचारसरणी, सोशल मीडिया आणि मित्रांच्या आहारी जाण्यापेक्षा सारासार विवेकानं विचार करून व्यवस्था बदलणाऱ्या उमेदवाराला मत देऊन आपण चांगले मतदार होऊ या. ऑनलाइन मतदानाची व्यवस्था झाली तर चांगलं होईल. पण हॅकिंग, बोगस मतदान आदी गोष्टी टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

विश्वरूप आढाव
उमेदवारानं समाजसेवा नि लोकहितासाठी काम प्रामाणिकपणं करावं. आपल्या कामाचं सतत आत्मपरीक्षण करावं. व्यवस्थेत बदल खूप हवेत. जे काही निर्णय घेणं आहे ते सारं सरकारच्याच हाती आहे. ही सरकारी निर्णयप्रक्रिया पारदर्शक हवी. लोकांचं मत जाणून घेतलं जावं, ते लादू नये. मुंबईजवळच्या आदिवासी पाडय़ांवरील पाणी समस्या सोडवून त्यांना रोजगाराचं साधन आणि मूलभूत गरजा पुरवल्या जाव्यात. त्यांचं प्रशासकीय व्यवस्थेच्या चक्रात अडकणं थांबायला हवं. सोशल मीडियासहित आपलं कुटुंब, मित्रमंडळी, सहकारी, उमेदवाराचं काम यांच्यासहित आवडीच्या पक्षाचा प्रभावही खूप पडतो. ऑनलाइन मतदानात सायबर क्राइम घडू शकत असल्यानं ते होऊ नये. पण त्याबाबत योग्य काळजी घेतल्यास वृद्ध-अपंगांना त्याचा लाभ होऊ शकतो. नकाराधिकार वापरल्यानं कुणीही नको, तर मग काय, असा प्रश्न उद्भवतो. शासनानं त्याबद्दल काही विचार केला असेल, पण नकाराधिकाराचा वापर फार कमी होईल.

अवधूत भागवत
निवडणुकांच्या काळात एक ट्रेण्ड होतो, लोकांना आवडते निर्णय घेण्याचा. त्यात सखोल विचार असतोच असं नाही. त्यापेक्षा सगळ्यांच्याच विकासाचा विचार करून गरजेनुसार निर्णय घ्या. लोकांना मोटिव्हेट करायला हवं. व्यवस्थेतील बदलांमध्ये संविधानात बदल करण्याची सोय असल्यानं आवश्यक ते बदल करायला हवेत. न्यायदानात वेग नि कारभारात पारदर्शकता यायला हवी. शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान नि पॅकेजेस पोहचून त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात. प्रगतीपथावर नेणाऱ्या विकासाच्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करायला हवं. पायाभूत सोयीसुविधांविषयी अधिक विचार करत शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न सोडवायला हवेत. मतदान करताना त्या उमेदवाराचं बॅकग्राऊंड, शिक्षण नि प्रेझेन्स ऑफ माइंड इत्यादी गोष्टी पडताळून मतदान करावं. उमेदवार निवडताना दूरदृष्टीनं विचार करा. ऑनलाइन मतदान ही कल्पना खूप छान असली, तरी लोकांना ती कितपत झेपेल, यात शंका आहे. त्यातल्या तांत्रिक गोष्टींवर सखोल विचार करायला हवा. उमेदवाराला पडताळून पाहिल्यावर नकाराधिकाराचा पर्याय वापरला जाईल. तो अधिक प्रमाणात वापरला गेला तर विकास हवाय, हे सिद्ध होईल. मग चांगले लोक आपणहून उभे राहतील. तसं झाल्यास ही खरोखर सकारात्मक गोष्ट होईल.

रोहिणी होरे
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा टेक्नोसॅव्ही उमेदवार हवा. लोकांना बदल हवा असतो. लोकांना पूर्ण होतील अशी नवी स्वप्नं दाखवणारा उमेदवार हवा. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी तरुणांपुढं एक ठोस कार्यक्रम ठेवायला हवा. त्यांची या कार्यक्रमातली भूमिका काय, ते विशद करावं. ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. युवा शक्ती आणि ज्येष्ठांचा अनुभव एकत्र आल्यास त्याचा उपयोग होईल. सोशल साइट्सवर अपडेट राहून काही जण पोस्ट-कमेंट वाचून आपली मतं तयार करतात. तरुणाईवर ओव्हरऑल मीडियाचाच खूप परिणाम होईल. कुटुंब, मित्रमंडळी, सहकारी आणि उमेदवारीचं काम हे मुद्दे वयाच्या त्या त्या टप्प्यावर प्रभावी ठरतात. साधारण विशीनंतर आपापलं मत तयार होऊ लागतं. विविध गोष्टी ऐकून, वाचून, अनुभवांनी आपली कुवत वाढते. मतं थोपवून घेतली जात नाहीत. त्यानंतर केलेलं मतदान हे विचारपूर्वक केलेलं मतदान असतं. ऑनलाइन मतदानात तांत्रिकदृष्टय़ा काही गरप्रकार होऊ शकतील. त्यामुळं ते शक्यतो नकोच. तांत्रिकदृष्टय़ा सुरक्षितता आलीच तर त्या दिवशी शहराबाहेर असणाऱ्यांना या सुविधेचा फायदा होईल. लांब राहून विचार करण्यापेक्षा प्रोसेसचा भाग होऊन त्यात सहभागी व्हायला हवं. व्यवस्थेतल्या घडामोडी आणि सकारात्मक गोष्टींविषयी विचार करून स्वत:चं मत मांडता आलं पाहिजे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva wall vote for
First published on: 04-04-2014 at 03:57 IST