आत्ता कुठे आमचे पंख पसरून उंच उडण्यासाठी आम्हाला आकाश खुलं झालंय आणि नेमकं तेव्हाच हे झालं. आता ‘अमुक ठिकाणी एकटी जाणारे’ म्हटल्यावर ‘नसतं साहस करायला जाऊ नकोस’ म्हणून सगळेच ठणकवतात. म्हणजे बंधनं शेवटी मुलींवरच येणार का? अशा घटनांना घाबरून स्वत:वर बंधनं घालून घेत जगणं आजच्या मुक्तेला नक्कीच मान्य नाही.
असं एकही क्षेत्र नाही जेथे महिला नाहीत, हे सांगताना किती अभिमान वाटतो! कंडक्टरपासून उद्योजिकांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढतच होती आणि नेमकं तेव्हा.. असं काहीसं थक्क करणारं, थरारून टाकणारं घडून गेलं.
मुंबईतल्या महालक्ष्मी स्टेशनजवळ शक्ती मिल्सच्या आवारात एका फोटो जर्नलिस्ट मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मुंबईतल्या घटनेमुळे पडलेल्या पडसादांचा आढावा घेताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या.
अशीच एक मुलगी कुर्ला स्टेशनवर ट्रेन पकडण्याच्या घाईत असताना अंगाला एक विचित्र स्पर्श झाला. ती गडबडून गेली, पण काही कळायच्या आतच ट्रेन सुटलेली. हतबल होऊन ती अशीच निमूटपणे घरी गेली. अहमदनगरची पुण्यात शिकणारी एक मुलगी कोथरूडमध्ये राहते. कॉलनीसमोरच रात्री ११ नंतर टवाळक्या करणाऱ्या पोरांमुळे ती खूप वैतागलेली आहे. घरमालक पावलं उचलत नाहीत तर तीनदा तक्रार करूनसुद्धा पोलीस दखल घेत नाहीत. मुंबईत इतकी लाजिरवाणी घटना घडूनही पोलीस हातपाय हलवत नाहीत म्हणजे कमालच आहे!
मुलींची छेड काढणं, अर्थात ईव्ह-टीिझगचं प्रमाण प्रचंड आहे. त्याला काळ-वेळ-स्थळ असे काही नियम किंवा अपवाद नाहीत. लोकल ट्रेनमध्ये निदान कम्पार्टमेंटस् तरी वेगळे असतात. पण बसमधली स्थिती याहून भयंकर असल्याचं मुलींनी सांगितलं. कोणीतरी काहीतरी करून जातं आणि आपल्याला काही कळायच्या आतच ती व्यक्ती गायब झालेली असते. मी स्वत: ज्या बसमध्ये होते ती एक घटना वेगळी होती. ती बस एका बाईने थांबवली आणि कंडक्टरला घेऊन नौपाडय़ाच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेली. प्रत्येकाला उशीर होत होता पण कोणीच चाकचूक केलं नाही. तेव्हा प्रसंगावधान राखल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येते एवढा मात्र जाणवलं.
    कॉलेजमध्ये वर्गात दिल्लीच्या घटनेचा विषय निघाला तेव्हा मॅडमनी विचारलं, की तुमच्यापकी कोणती मुलगी अजून ‘ईव्ह-टीझिंग’ला सामोरी नाही गेलीये? ४० मुली उपस्थित असताना दुर्दैवाने एकाही मुलीचा हात वर नाही आला.
    कट्टय़ावर याविषयी चर्चा करताना तर मुलांनी आम्हाला स्वत:जवळ छोटासा चाकू, सुरी किंवा काही नाहीच तर मिरचीची पूड जवळ ठेवायला सांगितली. काही झालंच तर आपण काय काय करू शकतो यावर प्रत्येकाने एकेक उपाय सुचवले.
   बलात्कार वा छेडछाड करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना ‘सातच्या आत घरात’ची च्या दरम्यानची शिस्त लावलेली असते. परिणामी, ८ नंतरचं जग त्यांनी क्वचितच पाहिलेला असतं.
    कॉलेजमध्ये प्रॉम नाइट असते तेव्हासुद्धा मुलींना त्यांचे पालक घ्यायला येतात किंवा सर्व मुलं-मुली एकत्र मिळून घरी जातात. फार दूर राहणाऱ्या मुली या भानगडीत सहसा पडतच नाहीत.
  खरंच! ‘आज अमुक ठिकाणी एकटं जायचं’ म्हटल्यावर सर्वच तापतात. ‘नसतं साहस करायला जाऊ नकोस’ म्हणून सगळेच ठणकवतात. त्यामुळे एकटं न फिरण्याची सवयच लागते, असं अनेक जणी म्हणाल्या.
    पण असे र्निबध जिप्सीचं मन असलेल्या अनेक मुलींना निराशावादी वाटले. समाजात अशा प्रवृत्ती असतील तर त्यांना तोंड मात्र द्यायला हवं हे खरं. आपले उडणारे पंख जखडून घेण्यात काय अर्थ आहे. आपली ‘मुंबई स्पिरिट’ आपण जागं ठेवायलाच हवं.
 झालेल्या प्रकारामुळे साऱ्या जणी सावध झाल्या आहेत. आधी बेसावध होत्या अशातला भाग नाही. पण थोडी भीती अधिक वाढली आहे. एकामागे एक घडणाऱ्या घटनांमुळे एकंदर वातावरणात खूप अस्वस्थता आली आहे हे खरं. नुकतीच घडलेली घटना काही नव्या प्रकारातली नव्हती पण ती इतक्या जवळ इतक्या बेमालूमपणे घडल्यानं मुलींचं जग हललंय. काहींनी कामांवर मर्यादा आणल्या आहेत तर काहींनी ग्रुप बनवून काम करायचा मार्ग निवडला आहे. यातून नेमकं आपण काय करायचं हे अंतिमत: प्रत्येक स्वत:लाच ठरवावा लागणार आहे. पण अशा घटनांना घाबरून स्वत:वर बंधनं घालून घेत जगणं आजच्या मुक्तेला नक्कीच मान्य नाही, हे खरं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमुलीGirls
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why only girls has restrictions
First published on: 30-08-2013 at 01:05 IST