महिला राज!

महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखली जाणारी महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

viva2 mitali raj
महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज

दीपाली पोटे-आगवणे

महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखली जाणारी महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिच्या या निवृत्तीमुळे एका मोठय़ा पर्वाची समाप्ती झाली. मिताली राजने तिच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर सर्वाना प्रभावित करत वयाच्या १७व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघामध्ये प्रवेश मिळवला होता. तब्बल २३ वर्षे दमदार कामगिरी करत महिला क्रिकेटमध्ये तिने आपले अधिराज्य गाजवले.  आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील अशक्य वाटणारे अनेक विक्रम मितालीने आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपल्या नावावर केले आहेत. तिच्या या विक्रमांमुळे आणि तिच्यामध्ये असलेल्या अलौकिक गुणांमुळे इतर तरुण महिला खेळाडूंसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.  १९९९ साली क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मितालीने दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलत भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक नवीन क्रांती घडवून आणली. अनेक तरुण महिला खेळाडूंची ती सुपरस्टार बनली आहे. तिच्या संयमी नेतृत्व आणि कर्तृत्वामुळे महिला क्रिकेटला जगभर प्रसिद्धी आणि एक ग्लॅमर मिळाले. गेली २३ वर्षे मैदान गाजवणारी मिताली आता तिच्या दुसऱ्या पर्वामध्ये महिला क्रिकेटला मैदानाच्या बाहेर राहून कशा प्रकारे एका उंचीपर्येत पोहोचवण्यास मदत करेल याकडे अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ खेळाडूंचे लक्ष लागले आहे. तिच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल, भविष्यातील तिच्या वाटचालीबद्दल देशभरात विविध स्तरांवर खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

कूल कॅप्टन!

मिताली राज आणि मी गेले १०-१२ वर्षे एकत्र आहोत. आपल्या कामाप्रति तिची असणारी नैतिकता ही वाखाणण्याजोगी आहे. तिने फक्त स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित न करता आपला संघ कशा प्रकारे मजबूत होऊ शकतो, यासाठी कायम प्रयत्न केले. खेळ म्हटले की दबाव हा असतोच, परंतु क्रिकेटच्या मैदानातले आणि मैदानाबाहेरील सर्वच प्रकारचे प्रेशर ती उत्तमरीत्या हाताळते. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय या दोन्ही क्रिकेटला ती समान महत्त्व देते. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचा गर्व न बाळगता तिने प्रत्येक स्तरावर आपली चोख कामगिरी बजावली. मिताली बऱ्याच वर्षांपासून संघाचा भाग राहिली आहे. कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी पार पाडत असताना  तिने एकाच वेळी संघामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारे  एकत्रितरीत्या सांभाळले आहे. आता ज्या तरुण मुली क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत त्यांनी मितालीचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून आपल्या खेळाप्रति कायम प्रामाणिक राहून खूप मेहनत घेणे गरजेचे आहे.

– हेमलता काला, ( उत्तर प्रदेश महिला संघाच्या प्रशिक्षक, माजी भारतीय क्रिकेटपटू)

मितालीच्या साथीने खेळायला मिळणे हेच माझे सौभाग्य  

मितालीसारख्या एका महान खेळाडूसोबत खेळत असताना प्रत्येक दिवशी काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तिच्याबरोबर तिच्या नेतृत्वाखाली खेळायला मिळणं माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. भारतीय संघातच नाही तर आम्ही भारतीय रेल्वेच्या महिला संघामध्येदेखील एकत्र खेळलो आहोत. तिने अनेक अशक्य असे रेकॉर्ड आपल्या नावावर करून भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक क्रांती घडवून आणली. मितालीने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हाची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक होता.  मुली सामन्यांसाठी रेल्वेने प्रवास करायच्या, स्वत:चं किटदेखील त्यांच्याकडे नसायचे; परंतु आता त्या विमानाने प्रवास करतात. त्यांना उत्तम सोयी दिल्या जातात. चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. चांगल्या मैदानामध्ये सामने खेळवले जातात. त्यामुळे त्यांच्या खेळाचा दर्जादेखील उंचावला आहे. ही क्रांती केवळ मितालीमुळे शक्य झाली आहे. आज भारतीय महिला संघाकडे सन्मानाने पाहिले जाते. मितालीचा जन्म हा क्रिकेटसाठीच  झाला आहे असे मला वाटते, कारण तिने गेली २२ वर्षे क्रिकेटला समर्पित केली आहेत.  

– नूशीन अल खादिर, (भारतीय क्रिकेटपटू) 

युथ आयकॉन

मिताली राज ही सध्याच्या युवा महिला खेळाडूंची प्रेरणास्थान बनली आहे. भारतीय महिला क्रिकेटला तिने आपल्या सर्वोत्तम खेळीमुळे एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. हे शिखर गाठण्यासाठी तिने गेली कित्येक वर्षे कठोर मेहनत घेतली आहे. मी तिला जवळून पाहिले आहे. तिची आकलनशक्ती अत्यंत उत्तम आहे. मैदानामध्ये योग्य ते निर्णय योग्य वेळी घेण्याची धमक कायमच तिच्यामध्ये होती. तिच्या याच अष्टपैलू गुणांचा संघाला कायमच फायदा झाला आहे. निवृत्ती घेण्याच्या आधी तिने भारतीय महिला संघाची फळी मजबूत केली आहे. गेली २० वर्षे यासाठी तिने खूप मेहनत घेतली. या गोष्टीचा फायदा पुढच्या पिढीला नक्कीच होईल.  मिताली एक असं एकमेव व्यक्तिमत्त्व आहे, की जे महिला क्रिकेटमध्ये अजून सुधारणा आणू शकते. कारण सारासार विचार करून योग्य  निर्णय घेण्याची  क्षमता तिच्यात असल्यामुळे तिने मांडलेल्या विचारांना नेहमीच महत्त्व दिले जाते. निवृत्तीनंतर भारतीय महिला संघाच्या प्रशासकीय विभागात जर तिने लक्ष दिले तर अजून चांगले दिवस  ती महिला क्रिकेटला मिळवून देऊ शकते.   

– कल्पना काडरेसा, (भारतीय रेल्वे संघाची व्यवस्थापक)

मिताली माझा आदर्श 

मिताली राजसह ड्रेसिंग रूम शेअर करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिच्यामध्ये असणारा संयम, सातत्य आणि शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता हे गुण प्रत्येक खेळाडूला शिकण्यासारखे आहेत. नेहमी भविष्याचा विचार करून त्या गोष्टीकडे तिचा बघण्याचा आणि विचार करण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच सकारात्मक असतो. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. आम्ही कायमच त्यांना खेळाचा सराव करताना पाहतो. बरेच खेळाडू आले, खेळले आणि गेले, परंतु मिताली अशी एकमेव खेळाडू आहे जिने आपले संघामधील स्थान कायम ठेवले. निवृत्तीनंतर तिच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या पर्वामध्ये महिला क्रिकेट संघाला पुरुषांच्या संघाप्रमाणे एक चांगले स्थान व ओळख  मिळावी यासाठी ती नक्कीच प्रयत्न करेल.

– मोना मेश्राम, (भारतीय क्रिकेटपटू)

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women cricket former captain mithali raj international level retirement ysh

Next Story
‘ब्रॅण्ड’ टेल : मुफ्ती
फोटो गॅलरी