काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गणपतीच्या मिरवणुकीत ढोल ताशा वाजत होता. बाप्पाच्या स्वागताला सगळे सज्ज झाले होते आणि तितक्यात सगळ्यांच्या माना वळल्या गेल्या. कारण त्या ढोल ताशा पथकात एक एकटी, छोट्या चणीची मुलगी सगळ्या मुलांच्या मध्ये उभी राहून ढोल वाजवत होती. त्यानंतर काळ बदलला आणि कुर्ता फेटा घालून, मुलांच्या बरोबरीने किंबहुना मुलांनाही लाजवेल अशा उत्साहात ढोल वाजवणाऱ्या मुली सर्रास दिसू लागल्या. ‘घरात गणपती बाप्पाची आरती करण्याइतकंच पावित्र्य त्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताला ढोल वाजवण्यात आहे’ असं म्हणू लागल्या. पुण्यात शिवगर्जना, नादब्रह्म, रुद्र अशा मोठय़ा पथकांमधून मुली ढोल वाजवताना दिसतात आणि काही ठिकाणी तर मुलींची स्वतंत्र पथकं पण आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून रुचिता ‘रुद्र’ आणि आता ‘परशुराम’ या पथकांमध्ये ढोल वाजवते आहे. ‘‘गणपतीच्या आगमनाच्या स्वागतातला ‘चार्म’ अनुभवताच मी लहानाची मोठी झाले. जेव्हा मला ढोल वाजवण्याची संधी मिळाली तेव्हा मी ‘काहीतरी नवीन करायला मिळतंय’ म्हणून तयार झाले.पण प्रत्यक्ष वाजवायला लागल्यावर लक्षात आले की, हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. सुरुवातीला ढोलाच्या वजनाने मान, पाठ आणि हात प्रचंड अवघडून यायचे पण हळूहळू त्याची सवय झाली आणि आता आम्ही ते जड ढोल घेऊन ३ तास वगैरे तालीम करतो. त्या तीन तासात मी तितकंच पावित्र्य, तितकीच पॅशन आणि तितकंच आंतरिक समाधान अनुभवते जितकं देवपूजा करताना मिळतं.’’…‘नादब्रह्म’ या पथकात असणारी विनया सांगते, ‘‘ढोल पथकात ढोल वाजवताना कुठेही ‘जेन्डर बायस’ चा अनुभव आला नाही. जितक्या ताकदीने मुलं ढोल वाजवतात तितक्याच ताकदीने आम्ही मुलीपण ढोल वाजवतो आणि तितक्याच उत्साहात ढोल ताणण्यासारखी कामंपण करतो. पथकात सराव करताना एक वेगळी शिस्त, टीम स्पिरीट अंगी बाणवावं लागतं. एका तालात एका नेतृत्वाखाली सगळ्यांनी मिळून ढोल वाजवणं हे आपापसातले सारे मतभेद सोडून एकत्र यायला लावणारं आहे. टीम वर्क ची हि नशा अनुभवण्यासाठी आमच्यातली काही हौशी मंडळी तर दिवसभर नोकरी करून मग रात्री तालीम करायला येतात.’’
या सगळ्या उत्साही, ‘पॅशनेट’ वातावरणात परवाच्या दिल्ली मुंबईत घडलेल्या घटनांनी मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. गणपतीच्या काळात होणारे ईव्ह टीजिंगसारखे गरप्रकार आजही तितक्याच प्रमाणात चालू आहेत. पण पथकात ढोल वाजवणाऱ्या मुलींच्या बाबतीत मात्र पथकांकडून शक्य तितकी सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. विनया आणि रुचिता दोघींनीही याबाबतीत सारखाच अनुभव सांगितला. मिरवणुकीत ढोल वाजवताना मुलींना मधल्या ओळींमध्ये वाजवायला दिले जाते जेणेकरून त्यांच्या आजूबाजूला इतर साथीदारांचे कोंडाळे असते.
रुचिता म्हणते, ‘‘आम्ही मुलीही कटाक्षाने पूर्ण अंगभरून कपडे व जॅकेट असे कपडे घालूनच तालमीला जातो. रोजची तीन तीन तासांची प्रॅक्टिस कधी कधी उशिरापर्यंत लांबते. अशा वेळी पथकातले मित्र जबाबदारीने घरापर्यंत सोडायला येतात.’’
हर्षांली मात्र पुण्याच्या गणेशोत्सव परंपरेला ‘सिरीयसली’ घेणारी, त्याचा सार्थ अभिमान असणारी. ‘‘ मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांमध्ये ढोल वाजवण्यात एक वेगळी मजा असते, एक वेगळा अभिमान असतो. ‘ऐन गणपतीत रात्री लक्ष्मी रोड वर ढोल वाजवणं’ हा ‘ वन्स इन लाईफटाईम’ अनुभवच असतो.
ढोल, ताशा, झांज अशा पथकांसोबत मिरवणुकीची परंपरा आपल्याला लाभली आहे ती आपण नाही तर मग कोण जपणार? असा खडा सवालही हर्षांली करते.
‘तुमची पिढी आपल्या परंपरा ,संस्कृती विसरत चालली आहे’ अशा टोमण्यांवर मात करत आपल्या यंगीस्तानातले ‘फ्रेंड्स’ ढोल वाजवत आश्वासन देताहेत, जुन्या नव्याचा मेळ घालत आपल्या संस्कृतीतला ‘इसेन्स’ जपण्याचं.
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2013 रोजी प्रकाशित
उत्साही निनाद
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गणपतीच्या मिरवणुकीत ढोल ताशा वाजत होता. बाप्पाच्या स्वागताला सगळे सज्ज झाले होते आणि तितक्यात सगळ्यांच्या माना

First published on: 06-09-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women dhol pathak in mumbai