वेदवती चिपळूणकर परांजपे
Already have an account? Sign in
प्रत्येकाच्या आयुष्यातला, रोजच्या जगण्यातला सर्वात महत्त्वाचा वेळ म्हणजे झोप! कदाचित हे सगळय़ांचं मत नसेलही, कारण प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी वेगवेगळय़ा असतात. काहींसाठी काम महत्त्वाचं असतं, तर काहींसाठी ‘खाणं’ सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. काहींसाठी फिटनेस सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, तर काहींसाठी शिक्षण. मात्र झोपेसारख्या मौल्यवान गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, तिला कायम दुय्यमच लेखतो. ‘आधी बाकी सगळी कामं होऊ देत, मग झोपू’, ‘आधी उद्याची तयारी होऊ दे, मग झोपू’, ‘दिवसभरातून आत्ता वेळ मिळालाय, जरा एखादा मूव्ही बघून मग झोपू’ या आणि अशा अनेक गोष्टींना प्राधान्य देऊन आपण झोपेला ‘वेटिंग’वर ठेवत राहतो; पण त्याच झोपेचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याची ‘वर्ल्ड स्लीप डे’च्या निमित्ताने एकदा उजळणी करू या.
दिवसातले सात तास तरी झोप मिळाली पाहिजे, असं आपलं विज्ञान सांगतं. ‘टीनेजर्सना तर नऊ तासांपर्यंत झोप गरजेची असते. त्यांच्यात होणारे हार्मोनल बदल, वाढीचं वय, व्यायाम आणि विश्रांतीची असलेली गरज या सगळय़ा बाबी लक्षात घेता त्यांना व्यवस्थित शांत झोप मिळणं अत्यावश्यक आहे. अगदी पंचविशीपर्यंत सर्वाना हेच लागू पडतं. झोपेकडे केवळ झोप ही क्रिया असं म्हणून पाहता येणार नाही, तर ती आपल्या संपूर्ण रुटीनवर परिणाम करणारी बाब आहे आणि आपल्या संपूर्ण रुटीनचा तिच्यावरही परिणाम होतो, हे समजून घेतलं पाहिजे,’ असं सायकॉलॉजिस्ट डॉ. वैशाली देशमुख सांगतात. अभ्यास, क्लासेस, वाचन, लिखाण या सगळय़ात अडकून मुलांची शारीरिक हालचाल फारशी होत नाही आणि त्यामुळे शरीर थकत नाही. शरीर योग्य तेवढय़ा प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीने, म्हणजे अर्थात व्यायामाने, थकलेलं नसेल तर शांत झोप मिळत नाही. प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा, नोकरीचे इंटरव्ह्यूज, इंटर्नशिप, पहिली नोकरी, ती टिकवण्याची धडपड अशा सगळय़ा तणावाखाली शांत झोप मिळत नाही. त्यापुढच्या वयातली तरुणाई, साधारण पस्तीस वर्षांपर्यंतची, वेगळय़ा तणावाखाली राहत असते. त्यांना त्यांचं घर, संसार, मुलं, मुलांची शिकवण अशा गोष्टी जास्त महत्त्वाच्या आणि ताण देणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांची शांत झोप उडालेली असते. मात्र कोणत्याही वयात आणि कोणत्याही ठिकाणी आपण असलो तरी झोप हा आपल्या संपूर्ण मानसिक संतुलनाचा मोठा आधार आहे, असं त्या सांगतात.
पी.जी.मध्ये राहणारी आणि झोपेची सोय नीटनेटकी नसलेली तरुणाई, झोप आल्यावर घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात अंग टाकून देणारी तरुणाई, बेडवर लोळत पिझ्झा खाणारी तरुणाई, या आणि अशा बऱ्याच सवयी झोपेच्या आरोग्याला हानीकारक असतात. सव्र्हेनुसार पन्नास टक्के तरुणाईला झोप कमी झाल्यामुळे अनेक त्रास होतात. शिफ्ट डय़ुटीजमुळे आणि एकूणच बिघडलेल्या रुटीनमुळे वेडय़ावाकडय़ा वेळी खाण्याच्या सवयी तरुणांमध्ये आहेत. कोणत्याही वेळी खाणं, व्यायाम, कोणत्याही वेळी झोपून उठणं, अशा घडय़ाळाशी अजिबात न बांधलेल्या सवयी आपली झोप सुखकारक करण्याऐवजी अधिक त्रासदायक करतात. लॉकडाऊनमध्ये तर संपूर्ण वेळ घरात असल्यामुळे कोणत्याही वेळी झोपायची चटक सगळय़ांना लागली आहे. सव्र्हेनुसार पन्नास टक्के तरुणाईने लॉकडाऊनमध्ये आपलं रुटीन नीट लावून घेतलं, तर पन्नास टक्के तरुणाईने आपला दिनक्रम आधीपेक्षा बिघडवून घेतला.
नुकत्याच झालेल्या याच सव्र्हेनुसार संपूर्ण जगभरच तरुणाईच्या झोपेचं चक्र बिघडलेलं दिसतं. वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे वयस्कर लोकांनाही झोप लागण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होतात. तरुणाई मात्र सतत स्क्रीनच्या समोर डोळय़ांनादेखील ताण देते आणि मेंदूलादेखील. झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करावा असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. डोळय़ांवरच्या ताणाने शारीरिक झोप लागत नाही आणि मन सोशल मीडियात अडकून पडल्यामुळे मानसिक आरामही मिळत नाही. या सगळय़ाचा परिणाम जीवनशैलीवर होतो आणि आपल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मुळातला प्राथमिक बदल हा जीवनशैलीमध्ये करावा लागेल. वेळच्या वेळी जेवणखाण सांभाळणं, कमीत कमी आठ तास झोप घेणं, झोपायच्या वेळी मनावर कोणतंही प्रेशर येऊ न देणं असे काही नियम प्रत्येकाने स्वत:ला लावून घ्यायला हवेत.
झोपेसारखी अत्यंत साधी, सरळ आणि मूलभूत बाब सांभाळण्यासाठी प्रयत्न करावे लागणं हा आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा थेट मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर झालेला परिणाम आहे. त्यामुळे त्याकडे वेळीच लक्ष देऊन आपल्या झोप न लागण्यामागची कारणं शोधून काढायला हवीत. झोप पुरेशा प्रमाणात झाली तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होणार आहे हे लक्षात घेऊन झोपेचं समीकरण योग्य पद्धतीने सांभाळणं हे तरुणाईसाठी अत्यंत निकडीचं आहे.
झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करावा असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. डोळय़ांवरच्या ताणाने शारीरिक झोप लागत नाही आणि मन सोशल मीडियात अडकून पडल्यामुळे मानसिक आरामही मिळत नाही. या सगळय़ाचा परिणाम जीवनशैलीवर होतो आणि आपल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मुळातला प्राथमिक बदल हा जीवनशैलीमध्ये करावा लागेल.