कॉलेजच्या मुलांचा हक्काचा कट्टा, टाइमपास करणाऱ्यांची फेव्हरेट जागा, शॉपोहोलिक मुलींचा वीकपॉइंट, गेमाडय़ांची हमखास सापडण्याची जागा आणि खवय्यांची पंढरी असं सगळं काही मॉल नावाच्या एकाच छताखाली असू शकतं. म्हणून तर जिवाची जत्रा करण्याचं ठिकाण म्हणून शॉपिंग मॉल ओळखले जाऊ लागलेत.
ग्रुपवरची चर्चा ऐन रंगात आलेली असताना.. ‘गाइज, धिस एम. यु. (मुंबई युनिव्हर्सिटि).. माय गुडनेस!!! जून उगवला परीक्षा संपायला. मिलते है ना यार.. जाम बोअर झालंय. कोण कोण भेटतंय बोला पटापट.’ निधीने विचारायची खोटी. धडाधड ‘थम्स अप’ झळकायला लागले. थोडक्यात, पब्लिक इन होतं तर! आता फक्त कुठे भेटायचं ते ठरवायचं होतं. ‘यार इनॉर्बटि को जाते है ना. ’. ‘ए नाही, इनॉर्बिट काय! ग्रुपमधलं मेजॉरिटी पब्लिक ठाण्यात राहतं. आर मॉल किंवा विवियाना. एक काय ते ठरवा.’ ‘नेहमी काय तुमचं ठाणे.. कधी तरी वाशीपर्यंत आलात तर पाय झिजणार नाहीत तुमचे.’ शेवटी मध्यस्थी करायला श्वेताबाई मध्ये पडल्या आणि अखेरीस ठाणे वाशी वाद थांबला तो भांडुपच्या नेपच्यूनपाशी. ग्रुपवर ‘मजे का हर पल’ तय झाला आणि ठरल्याप्रमाणे सगळ्यांचे डोळे मॉलच्या वाटेकडे लागले.
मॉलला पोहोचल्यावर यांना कसला धीर राहतोय. मंडळी आधी निघाली टम्मी खूश करायला. फूडकोर्टमधली सगळी दुकानं सेवेला हजर होतीच. ‘ए तो डॉमिनोजवाला किती क्युट होता यार!’.  ‘कसला क्युट! काही क्युट ब्युट नव्हता तो. चॉइस सुधारा बाईसाहेब!’ या पोरींच्या गप्पा पुढचा किती काळ चालल्या देवच जाणे! पण, हा मॉलस्नेह इतक्यात तरी आटपायचा नाही हे स्पष्ट होतं. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपनंतर तरुण मंडळी कुठे भेटतील तर मॉलमध्ये. हे मुंबई-ठाण्यातच नाही तर पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद अगदी सगळ्या मोठय़ा शहरात लागू आहे.
मॉलमध्ये जायचं म्हणजे खाना पिना, पिक्चर देखना तो बनता है बॉस! अगदी मुव्ही बीव्हीच्या फंदात पडलो नाही तरी करायला काही कमी उद्योग नसतात मॉलमध्ये. मागे एकदा एक ‘धवन’ वेडी मत्रीण ‘म तेरा हिरो’च्या प्रमोशनच्या वेळी कुठल्याशा मॉलमध्ये पधारली होती. मध्यंतरी हनी सिंगने काहीच्या काहीच गारूड घातलं होतं यंगीस्तानवर! त्याच्या गाण्याइतकंच त्याच्या स्टाइललाही फॉलो केलं जायचं. या पंजाबी मुंडय़ाला बघायला म्हणून पोरंपोरी अगदी लेक्चर्स बंक करून मॉलमध्ये जमायचे. मॉलमध्ये होणारे मूव्ही प्रमोशन्स हा गेल्या एक-दोन वर्षांपासून दिसू लागलेला एक नवा ‘एंटर’ट्रेंड  मनोरंजनाच्या या सोहळ्यात गेमाडय़ांना खुणावतात त्यांचे लाडके गेमिंग झोन्स. गेमिंग झोन्समध्ये रमणारी गिरगावची नक्षत्रा बोडस म्हणते, ‘मॉलमधल्या गेमिंग झोन्समध्ये गेलं की पहिल्यांदा लक्ष वेधून घेतात ते तिकडचे बौद्धिक गेम्स. त्यामुळे डोक्याला चालना मिळतेच आणि खूप दिवसांपासून हवीहवीशी वाटणारी रिफ्रेशमेंटदेखील. याशिवाय कॅरमसारखा असणारा गेिमग झोनमधला एक गेम खेळायला मला आवडतो.’ ही नेहमीच्या दिवसांमधली मजा. पण, फेस्टिव्ह सिझन्समधला मॉलचा नजारा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचं देखणं कॉम्बिनेशन. मॉलमधले फेस्टिव्ह रंग नवरात्रीत मॉलमध्ये बसवलेल्या देवीपासून ते ख्रिसमसच्या केक सेलिब्रेशन इव्हेंटपर्यंत हरप्रकारे खुलून येतात. थोडक्यात काय, मॉल इज इक्वल टू शॉपिंग असं समीकरण राहिलेलं नसून ती एक लेजर अ‍ॅक्टिव्हिटी झालीये. हल्ली मॉलमध्ये गेलं की जत्रेचाच फील येतो. जत्रेत पूर्वी दिसणाऱ्या किती तरी गोष्टी मॉलमध्ये हमखास दिसतात. अगदी जत्रेतला बर्फाचा गोळा आणि कुल्फीसुद्धा! हेअरकटिंग सलॉन्स, फुट मसाज, स्पा, कॅफेज हे सगळं आता मॉलसंस्कृतीचाच एक भाग झालंय. एकटी व्यक्तीसुद्धा मॉलच्या माहौलात रमते. त्यासाठी कुणी कंपनी असण्याचीसुद्धा गरज नाही.
लीना दातार -viva.loksatta@gmail.com       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth and mall culture
First published on: 19-06-2015 at 12:47 IST