सवाई तरूणाई

शास्त्रीय संगीताची पर्वणी असलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव गुरुवारपासून सुरू झालाय. या महोत्सवात तरुणांची गर्दी दरवर्षी वाढत जाताना दिसतेय.

शास्त्रीय संगीताची पर्वणी असलेला सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव गुरुवारपासून सुरू झालाय. या महोत्सवात तरुणांची गर्दी दरवर्षी वाढत जाताना दिसतेय. काय आहे ही ‘सवाई’ची क्रेझ? सवाईला येणाऱ्या तरुणाईच्या गप्पांचा वेध घ्यायचा हा प्रयत्न.
‘‘तिकिटं कधीपासून सुरू होतायेत?’’ असा प्रश्न दिवाळीच्या सुट्टय़ांनंतर पुण्यातल्या कॉलेजेसचे तमाम कट्टेकरी एकमेकांना विचारू लागतात आणि ही तिकीट कोणा नाटक-सिनेमांची नसून आमच्या पुणेरी संस्कृतीतील एक अविभाज्य घटक असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची असतात. दिवाळीच्या आधी सवाईच्या तारखा येतात आणि मग तमाम पुणेकरांना (आणि हो अर्थातच तरुणाईदेखील मागे नाही बरं का!) सवाईचे वेध लागतात. काही तरुण तर वर्षभर सेिव्हग करून सवाईसाठी बजेटदेखील ठरवतात.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी आपले गुरू पं. सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्या स्मरणार्थ सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला आणि तो आता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणून ओळखला जातोय. गेली ६० वष्रे तमाम शास्त्रीय संगीतातील रसिकांना एकत्र बांधणारा हा एक महा-उत्सव आहे. सवाई म्हणजे पूर्णपणे शास्त्रीय संगीत मफल. अनेक जुनेजाणते दिग्गज आपली कला इथे रूजू करतात. त्यांना ऐकायला मिळतं, ते वातावरण अनुभवायला मिळतं. म्हणून आदरवाईज शास्त्रीय संगीत न ऐकणारा तरुणही तिथे आवर्जून जातो. पुणेरी सवाई परंपरेला भेदणं निव्वळ अशक्य आहे. कारण सवाईचं वेड तरुणाईतही तितकंच भिनलेलं आहे. खास विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचं आय कार्ड दाखवून विशेष सवलत पास अवघ्या २०० रुपयांमध्ये मिळतो आणि त्याचाच लाभ घेत मोठय़ा प्रमाणावर तरुणाई ही आगळी अनुभूती घेत असते.
या वर्षीचे मान्यवर कोण, काय वेगळं असेल या विषयांबरोबरच सवाईला जाणाऱ्या तरुणाईच्या गप्पांमधे ओघाने जे विषय येतात त्यामध्ये ‘सवाई’च्या निमित्ताने लागणारे स्टॉल्स, ‘सवाई’ला जाताना कसा पेहराव करायचा? काय घालायचं? याकडेही वळतात. मग सगळे ठरवून थोडासा एथनिक टच असलेला पेहराव करतात. एकदा तिथे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो हे जरी खरं असलं तरी अशा गप्पा रंगतात हे खरंय!! काहींसाठी सवाई म्हणजे श्रवणीय पर्वणी आहे. काहींसाठी स्टेटस सिंम्बॉल आहे तर काहीसाठी अमेिझग क्रेझ. काहींची फ्रेंडशिप तर काहीची लव्ह स्टोरी इथे घडलीये आणि मुख्य म्हणजे टिकलीये. १५००० लोक जमूनही एकदा कार्यक्रम सुरू झाला की रमणबागेत अक्षरश: पिनड्रॉप सायलेन्स असतो. तरुणाईचा प्रतिसाद आणि उत्साह जाणून घेण्यासाठी तिकिटविक्री करणाऱ्या नावडीकरांना बोलतं केलं तेव्हा ते म्हणाले की, तिकिटाच्या तारखा विचारण्यासाठी सतत मुलं येतात आणि तारखा जाहीर झाल्यानंतर तर तरुणांची अक्षरश: रांग लागते. नवीन पिढीचा संगीताकडे बघण्याचा स्वत:चा असा दृष्टिकोन आहे. ते सगळंच ऐकतात आणि सगळंच अ‍ॅप्रिशिएट करत पुढे घेऊन जातात. स्वरांची अनुभूती, प्रचंड शिस्त आणि शांतता, स्टेजवरच्या माणसांचं भारावून टाकणं आणि खालच्या हजारो लोकांचं भारावून जाणं, स्वत:ला हरवून बसणं हे सगळं अनुभवण्यासाठी एकदा तरी ‘सवाई’ला जायलाच पाहिजे. रसिकांची तल्लीनता आणि अस्सल पुणेरी दाद..या साऱ्या गोष्टीच ‘सवाई’ला स्पेशल बनवतात. संगीताशी कोणत्या ना कोणत्या कारणाने बांधले गेलेले किंवा संगीत ऐकायला आवडणारे सारेच इथे मंत्रमुग्ध असतात.
‘सवाई’ला हजेरी लावणारे तिथल्या स्टॉलवरून एकतरी चक्कर आवर्जून मारतात. हा अनुभव साठवून जरी ठेवला तरी हे संगीत पुन्हा पुन्हा ऐकायचा मोह होतोच. इथे असणाऱ्या स्टॉल्समधून सीडीजचा खजिना उपलब्ध असतो आणि तोही सवलतीच्या दरात. असंख्य प्रख्यात कलाकारांच्या स्वरानुभवाला जसं एकत्र फक्त ‘सवाई’तच भेटता येतं, तसं त्यांच्या संगीताची साठवण इथेच एकत्रितपणे मांडलेली दिसते. एरव्ही बसमधल्या भांडणापासून ते राजकारणापर्यंत आम्ही पुणेकर वाद घालतो. पण ‘सवाई’चा विषय निघाला की वाद संपून संवाद सुरू होतो.आणि तो पुढच्या ‘सवाई’पर्यंत चालूच राहतो. आठवणींच्या रूपात!!

पाकणीकरांचं कॅलेन्डर
फोटो च्या रूपात दरवर्षी निरनिराळ्या आठवणी जपून ठेवता याव्यात म्हणून कॅलेंडर आहेत. यातून जुन्याजाणत्या दिग्गज कलाकारांबद्दल माहिती तर मिळतेच व ही एक उत्तम स्मरणिका आहे. सतीश पाकणीकर गेली अनेक वष्रे ‘सवाई’च्या निमित्ताने हा प्रयोग करताहेत. पाकणीकर म्हणतात की, हल्लीच्या तरुणाईला शास्त्रीय संगीत भावतंच आणि त्यांचा प्रतिसादही छान मिळतो. कलाकारांचे दुर्मीळ फोटो आपल्याकडे असावेत असा अट्टहास आणि शास्त्रीय संगीताचा ध्यास हे सगळं बघून खूप छान वाटतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Youth in sawai gandharva bhimsen sangeet mahotsav

Next Story
क्लिक : पी. चैतन्य
ताज्या बातम्या