|| वेदवती चिपळूणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मल्लखांब या क्रीडाप्रकारात १७ वर्ष कार्यरत असणारी संचिता वयाच्या बाराव्या वर्षांपासून मल्लखांबशी जोडली गेली. सुरुवातीला राज्यस्तरावर खेळाडू म्हणून आणि आता प्रशिक्षक म्हणून तिने मल्लखांबसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. यूटय़ूबसारख्या नव्या माध्यमाचा वापर करत मल्लखांब जगभर पोहोचवण्यासाठी तिने ‘मल्लखांब लव्ह’ हे यूटय़ूब चॅनेलही सुरू केलं आहे.

यूटय़ूब हे असं एक माध्यम आहे ज्यावरून कित्येक लोकांपर्यंत आपली गोष्ट पोहोचवता येते. अनेकांपर्यंत पोहोचण्याचं साधंसोपं माध्यम म्हणून यूटय़ूबकडे बघितलं जातं. याच माध्यमातून आपल्या मातीतला क्रीडाप्रकार सर्वदूर पोहोचवला तो संचिता पाटील-देवल हिने! मल्लखांब या क्रीडाप्रकारात १७ वर्ष कार्यरत असणारी संचिता वयाच्या बाराव्या वर्षांपासून मल्लखांबशी जोडली गेली. सुरुवातीला राज्यस्तरावर खेळाडू म्हणून आणि आता प्रशिक्षक म्हणून तिने मल्लखांबसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. तिने आर्किओलॉजीमध्ये एमए केलं आणि इव्हेंट अ‍ॅण्ड मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. मात्र तिचं संपूर्ण लक्ष हे केवळ मल्लखांबावरच होतं. आता तिच्याकडून प्रशिक्षण घेणारे तिचे अनेक शिष्य राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मल्लखांब स्पर्धामध्ये उत्तम कामगिरी करत आहेत.

मल्लखांबाबद्दलचं पहिलंवहिलं यूटय़ूब चॅनेल तयार करणारी संचिता तिच्या मल्लखांबाच्या आवडीबद्दल खूप मनापासून बोलते. ‘खरं तर मी मल्लखांब नाही निवडला; मल्लखांबाने मला निवडलं’, संचिता म्हणते. ‘वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी मल्लखांब शिकते आहे. शिक्षण महत्त्वाचं नेहमीच होतं. म्हणूनच शिक्षणात स्वत:ला मागे पडू द्यायचंच नव्हतं. माझ्या घरातले बहुतेक नातेवाईक शिक्षण क्षेत्रात किंवा शिक्षकी पेशात आहेत. माझे बाबा मूकबधिरांचे शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व होतंच. मात्र आईबाबांनी कधीच त्यांच्या क्षेत्रात येण्यासाठी माझ्यावर कोणतंही प्रेशर येऊ दिलं नाही. शिक्षणाबरोबरच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजही महत्त्वाच्या आहेत हे त्यांनी माझ्यावर बिंबवलं. मी आणि माझा भाऊ  दोघेही शिक्षणक्षेत्रात काम करत नाही’, असे सांगणारी संचिता मल्लखांब ही नुसती आवड नाही, तर ते प्रेम आहे. मल्लखांबाने मला जगण्याची शिस्त लावली, हेही तितक्याच आत्मविश्वासाने सांगते.

देशी क्रीडाप्रकार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याच्या कल्पनेने संचिताला नवीन मार्ग खुले झाले. यूटय़ूब चॅनेलच्या कल्पनेबद्दल आणि प्रत्यक्षात आणण्याबद्दल ती म्हणते, ‘यूटय़ूबवर अनेक मेकअपचे, ड्रेसिंगचे, स्टाइलचे असे व्हिडीओज बनत असतात, लोक पहात असतात. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की सोप्या पद्धतीने अनेकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे यूटय़ूब. लोकांना मल्लखांब म्हणजे नेमकं काय आहे हे समजावून सांगावं लागतं. त्यापेक्षा त्यांनी थेट व्हिडीओ बघितले की त्यांना कळणं सोपं जाईल आणि तोंडी वर्णन करण्यापेक्षा मलाही ते समजावणं सोपं होईल.’ यातून यूटय़ूब चॅनेलची कल्पना सुचल्याचं तिने सांगितलं. मात्र त्यावेळी हातात फक्त एक डीएसएलआर कॅमेरा होता. शूटिंग कसं करायचं, त्याच्यासाठी काय काय लागतं, सेटअप कसा लागतो, एडिटिंग म्हणजे काय, अशा कोणत्याच गोष्टींची काहीच माहिती नव्हती. मग त्यावरही मार्ग काढण्यासाठी यूटय़ूबचाच उपयोग केला आणि व्हिडीओ शूटिंगबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली, असं संचिता सांगते. माइक, ट्रायपॉड यांसारख्या बेसिक गोष्टी हळूहळू आम्ही घेतल्या. मी आणि माझा मित्र आशीष, जो आता माझा नवरा आहे, दोघांनी काही ट्रायल व्हिडीओज बनवले. थोडंफार एडिटिंग शिकण्यासाठीसुद्धा मी यूटय़ूबचीच मदत घेतली. पूर्णत: आम्ही तयार नव्हतो. पण यूटय़ूबवर अपलोड करण्याइतकं काहीतरी आमच्याकडे नक्कीच होतं. तोडक्यामोडक्या प्रयत्नांतून बनलेला व्हिडीओ आम्ही अपलोड करायचा ठरवला आणि जन्माला आलं आमचं चॅनेल ‘मल्लखांब लव्ह’! मूळ उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच चॅनेलवर व्हिडीओ बनवत राहिलो. हळूहळू चॅनेलला थोडाफार प्रतिसाद मिळायला लागला, अशा शब्दांत संचिताने या चॅनेलच्या जन्माची कथा सांगितली. सध्या तिच्या चॅनेलचे दीड हजारांच्या वर सबस्क्रायबर्स आहेत. म्हटलं तर संख्या कमी आहे, पण जी आहे ती आपली आहे आणि खरोखर कौतुकाने बघणारी आहे. हळूहळू ही संख्या वाढेल. संख्या वाढण्यापेक्षाही आनंद आहे तो याचा की आपले व्हिडीओज लोकांना आवडतात, समजतात आणि त्यांची उत्सुकता वाढते, असं ती म्हणते.

एका मुलीने क्रीडाप्रकारात प्रावीण्य मिळवणं आणि त्यातही त्याच्याकडेच करिअर म्हणून बघणं हे अजूनही लोकांना जरासं ‘वेगळं’ वाटतं. मात्र संचिताला तिच्या आईबाबांचा पूर्णत: पाठिंबा मिळाला. संचिता म्हणते, ‘मल्लखांब हे माझं करिअर कधी झालं हे मलाच कळलं नाही. मी कायम आवड म्हणूनच त्याच्याकडे पाहात आले आहे. मल्लखांब हा माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेला आहे. मी मल्लखांब आणि एरियल ट्रेनिंगची प्रशिक्षक आहे. अगदी सुरुवातीला आम्ही दोन वर्ग सुरू केले होते. मात्र त्याला लोकांचा प्रतिसाद हवा तसा न मिळाल्याने बंद करावे लागले. आता मात्र माझे बोरिवलीमध्ये दोन आणि घाटकोपरला एक असे तीन प्रशिक्षण वर्ग चालतात.’ आज तिच्या एका सेंटरवर एकाच वेळी जवळजवळ दीडशे मुलं मल्लखांब शिकतात. परिस्थिती काहीही असली तरी हार मानायची नाही हे आपल्याला मल्लखांबानेच शिकवल्याचं ती सांगते. कितीही उंचीवरून, कितीही वेळा पडलं तरी उठून उभं राहायचं आणि आपल्या ध्येयाकडे नजर ठेवून पुन्हा सुरुवात करायची ही मल्लखांबाची शिकवण आहे. माझ्या आईबाबांचा कधीच माझ्या करिअरला विरोध नव्हता. उलट आपली मुलगी इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करते आहे, त्यातही मल्लखांब करते याचा त्यांना प्रचंड अभिमान आणि आनंद आहे, हे सांगताना संचिताच्या चेहऱ्यावरही आनंद झळकतो.

आपल्या मातीशी नातं जपणाऱ्या या क्रीडाप्रकाराचा अधिक प्रचार व्हावा हे संचिताचं ध्येय आहे. ‘आज मागे वळून पाहताना वाटतं की मल्लखांबाने मला ओळख दिली, शिस्त दिली, जगण्याला आकार दिला. आज लहान लहान मुलांना मल्लखांब करताना बघते तेव्हा मला फार आनंद होतो. लहान मुलं ताई माझं पद्मासन बघ म्हणतात तेव्हा आपण त्यांच्यावर काहीतरी चांगले संस्कार करतो आहोत याची खात्री पटते. आपले खेळ, आपली संस्कृती, आपले संस्कार यांची त्यांना जाणीव करून देताना अभिमानही वाटतो आणि समाधानही..’, असं ती म्हणते. जेव्हा मी मल्लखांबाच्या स्पर्धाना जाते तेव्हा लोक आवर्जून भेटून माझ्या यूटय़ूब चॅनेलचं, माझ्या कामाचं कौतुक करतात. रोज मला कित्येक मेसेजेस आणि मेल्स येत राहतात. परदेशात राहून मल्लखांब या प्रकाराबद्दल आकर्षण वाटून ते शिकणारे असे अनेक लोक आहेत. रोप मल्लखांब शिकवायला इथे कोणी नाही, तर तुम्ही त्याचे पण व्हिडीओ करू शकाल का अशी एक विनंती बिहारमधून मला एकाने केली होती. ‘मल्लखांब लव्ह’ या चॅनेलच्या माध्यमातून मल्लखांबाला लोकांचं प्रेम मिळतंय आणि माझ्यासाठी तेच माझं यश आहे, असं संचिताने सांगितलं. मातीशी नाळ जपत आधुनिकतेचा हात धरून पुन्हा मोठय़ा होऊ  पाहणाऱ्या या खेळाला आणि त्यावर प्रचंड मेहनत घेणाऱ्या संचिताला मल्लखांब जगभर पोहोचवण्याची इच्छा आहे.

‘आयुष्यात एखादा निर्णय शंभर वेळा विचार करून घ्यायचा. पण एकदा निर्णय घेतला की मग हजार अडथळे समोर आले तरी मागे हटायचं नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत फक्त समाधान असणार आहे, बाकी सगळं इथेच राहणार आहे. त्यामुळे ज्यात आपल्याला समाधान मिळतंय ते करावं. परिस्थिती नेहमीच परीक्षा बघणार, आपल्या मन:स्थितीला आव्हानं देणार, मात्र आपण जिंकायचं ठरवलं तर अशक्य काहीच नसतं.’    – संचिता पाटील-देवल

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube channel mallakhamba
First published on: 13-06-2019 at 11:52 IST