डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सायन्स पार्कसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी १० कोटी निधी जाहीर केला. विद्यापीठाच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
विज्ञानातील तंत्रज्ञान गुंतागुंतीचे असते. प्रयोगातून विद्यार्थ्यांना शिकता यावे, या साठी सायन्स पार्क उभारण्याचा प्रस्ताव कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयास सादर केला होता. केंद्रात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख मंत्री असताना या अनुषंगाने प्रस्ताव पाठविला होता. दोन विषयांना एकत्र करून आंतरशाखा संशोधन व्हावे, तसेच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा प्रस्ताव तयार केला गेला. काही वाटा राज्याने उचलावा, असे अपेक्षित होते. ही रक्कम मिळावी, या साठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपेही प्रयत्न करीत होते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी १० कोटींचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, प्रयोगातून शिकता यावे म्हणून मोबाईल व्हॅनवर प्रयोगशाळा उभारण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस असल्याचे डॉ. पांढरीपांडे यांनी सांगितले.