काळ्या बाजारात नेण्यात येत असलेला रास्तभाव दुकानातील १२० क्विंटल तांदूळ सेनगाव पोलिसांनी जप्त करून आरोपी वाहनचालक जमशेद अली व शेख समीर यांना अटक केली. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले की, सोमवारी जिल्ह्य़ात सर्वत्र नाकेबंदी केली होती. रिसोडकडून सेनगावकडे येणारी मालमोटार (एमएच २४ एफ ९२६६)  नाकेबंदीवर असलेल्या सेनगाव पोलिसांनी अडविली व मालमोटारीची तपासणी केली असता १२० क्विंटल रास्तभाव दुकानाचा तांदूळ आढळला. रास्तभाव दुकानातील तांदूळ सोनू पंचारी (लोणी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम) यांच्या दुकानातील आहे. हा तांदूळ रिसोड येथून भरला. तो नांदेड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गोदामात टाकण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे दाभाडे यांनी सांगितले. निरीक्षक सी. पी. काकडे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. दोघांना सेनगावच्या प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.