विकास प्रक्रियेत शहरी भागातील निसर्ग संपदेवर निर्दयपणे आघात होत असताना आता लगतच्या लष्करी भागातही त्याचाच कित्ता गिरविला जाणार आहे. हिरवाईने नटलेल्या संरक्षण विभागाच्या देवळाली कॅम्प परिसरातील थोडी थोडकी नव्हे तर, १२० झाडांवर एकाचवेळी कु ऱ्हाड चालविण्याची तयारी तोफखाना स्कूलने केली आहे.कधीकाळी गुलशनाबाद असे नामधारण करणारे नाशिक विपूल निसर्गसंपदेमुळे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही परिचित होते. परंतु, विकासाच्या धबडग्यात कालौघात ही ओळख पुसली गेली. बहुतांश प्रमुख रस्त्यांना डेरेदार वृक्षांचे लाभलेले सानिध्य नामशेष झाले. रस्ते रुंदीकरण, बांधकामे अन् तत्सम वेगवेगळ्या योजना व प्रकल्पांसाठी हजारो झाडांवर घाव घातला गेला.  या घडामोडी आजही अव्याहतपणे सुरू असल्या तरी शहराचे वातावरण काहीअंशी शीतल ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली ती, शहरालगतच्या निसर्गसंपन्नतेने नटलेल्या लष्करी परिसराने. शेकडो एकरमध्ये सामावलेला हा परिसर वृक्षाच्छादीत आहे.
बेसुमार वृक्षांच्या कत्तलीमुळे शहर भकास होण्याच्या मार्गावर असताना हिरवाईचे दर्शन देणारा हा लष्करी परिसर शहरवासीयांना सुखद दिलासा देणारा. तथापि, या परिसरातील निसर्ग संपदेवरही कुऱ्हाड कोसळण्याच्या मार्गावर आहे. संरक्षण खात्याच्या जमिनीवरील १२० झाडे तोडण्याचे सुतोवाच तोफखाना स्कूलने केले आहे. देवळाली कॅम्पच्या तोफखाना स्कूलच्या अखत्यारीतील जमिनीवरील ही सर्व झाडे आहेत. त्यात गुलमोहोर ५, जांभुळ २४, निंब ६, सिसम २, इलो्क्लपट्स ८, शिरीष २८, बोर ४, गुलर ३, कातळ ४, बरगड २, आंबा १८, किनेर २, अशोका ३, पापडी २, पिंपळ ६ व पेरूच्या २ झाडांचा समावेश आहे.
लष्करी भागात इतक्या मोठय़ा प्रमाणात वृक्ष तोडले जाण्याची ही गेल्या काही वर्षांतील पहिलीच वेळ. वास्तविक, हा परिसर हिरवाईने आच्छादित रहावा याकरिता तोफखाना स्कूलची यंत्रणा प्रयत्नरत राहते. या वृक्षतोडीच्या निमित्ताने त्यास छेद दिला गेला आहे. एकाचवेळी इतकी वृक्ष तोडण्यामागील कारण तोफखाना स्कूलने स्पष्ट केलेले नाही. परंतु, शहरी भागाप्रमाणे विशिष्ट एखाद्या योजनेसाठी ही वृक्षतोड होणार असल्याची शक्यता आहे.