जुन्या वर्षांचा निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी एखाद्या गडकिल्ल्यावर जाणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. काही कट्टर गिरिभ्रमर तर या दिवशी गडकिल्ल्यांवर विशेष उपक्रमही राबवत असतात. मात्र गेली १३ वर्षे न चुकता ३१ डिसेंबरला किमान एका गडावर तरी सायकलस्वारी करण्याचा पराक्रम डोंबिवलीच्या सुशांत करंदीकर या तरुणाने केला आहे. यंदा सुशांत साताऱ्याजवळच्या सहा किल्ल्यांवर सायकलस्वारी करण्यासाठी रवाना झाला असून या वर्षी सायकलने ५० गड सर करण्याचा पराक्रम त्याच्या नावे जमा होणार आहे.
१९९४ मध्ये सुशांत आणि त्याचा एक मित्र पहिल्यांदा हरिश्चंद्रगडावर सायकल घेऊन गेले. त्यानंतर २००० साली ३१ डिसेंबरच्या दिवशी याच गडावर ते पुन्हा सायकलने गेले. त्या वेळी त्यांनी या सायकल मोहिमेबाबत गांभीर्याने विचार केला. पुढील प्रत्येक ३१ डिसेंबर हा सायकलस्वारी करून गडावरच साजरा करायचा, असा मानस करून या सर्वानी ‘निसर्ग गिरिभ्रमण’ नावाची संस्थाही सुरू केली. गेली १२ वर्षे सुशांत आणि त्याचे साथीदार सातत्याने ३१ डिसेंबरच्या आसपास सायकल घेऊन सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर भटकंती करायला निघतात.
गेल्या १२ वर्षांत सुशांतने हरिश्चंद्रगड, राजमाची-ढाक-बहिरी-भीमाशंकर, तोरणा-राजगड, पन्हाळगड-विशाळगड, चांदवड-राजदेर-कंचना-इंद्राणी-धोडण, आड-औंडा-पट्टा-वितंगा, नाणेघाट-जीवधन-चावंड-शिवनेरी, साल्हेर-सालोटा-मुल्हेर, रतनगड-कळसूबाई अशा अनेक मोहिमा सायकलवरून केल्या. या उपक्रमाच्या दहाव्या वर्षांत तर सुशांतने अवचितगड-सरसगड-सुधागड-वाघजाईमार्गे तैलबैला-घनगड-कोरी-तुंग-तिकोणा-विसापूर-लोहगड असे १० किल्ले सर केले होते.
यंदा सुशांत साताऱ्याजवळील पांडवगड-वैराटगड-चंदन-वंदन-अजिंक्यतारा-सज्जनगड हे किल्ले सायकलवरून पालथे घालणार आहे. त्यासाठी तो आणि त्याचे इतर सहकारी २९ डिसेंबर रोजीच रवाना झाले आहेत. या १३ वर्षांत सुशांतला दिवाकर भाटवडेकर, अमित जोशी, विलास वैद्य, अमेय आपटे, क्षिप्रा लोकरे, कांचन खरे, अमृता राजे, अजिंक्य कानेटकर, योगेश आंब्रे अशा अनेक सहकाऱ्यांची तोलामोलाची साथ लाभली आहे. साताऱ्याच्या यंदाच्या मोहिमेतही सुशांतसह दिवाकर भाटवडेकर, विकास चव्हाण आणि क्षितिजा लोकरे हे सहभागी झाले आहेत.
माउंटन बायकिंग या साहसखेळाला आपल्याकडे म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. आम्ही अगदी व्यावसायिक खेळाडू नसलो, तरीही आमच्याकडून या खेळासाठी जेवढे करता येईल, तेवढे करीत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ३१ डिसेंबरला अशा प्रकारे सायकलवरून गिर्यारोहण करण्याची धडपड आम्ही करतो, असे सुशांतने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. केवळ माउंटन बायकिंगवरच न थांबता सुशांतने आतापर्यंत दक्षिण भारत सायकलिंग, ऑल इंडिया सायकलिंग, पूर्व महाराष्ट्र सायकलिंग, लेह-लडाख सायकलिंग अशा अनेक मोहिमा केल्या आहेत. या मोहिमांद्वारे सुशांतने तब्बल ७५ हजार किलोमीटर प्रवास सायकलने केला आहे.