सिडको वसाहतीमध्ये प्रत्येक फुटाला लाखोंचा दर आल्याने वसाहतीलगतच्या गावांच्या जमिनींचा दर वधारला. अतिक्रमण करण्याच्या मनसुब्याने कळंबोली गावामधील पाच गुंठे जागेवरील पंधरा वृक्षांची कत्तल रातोरात करण्यात आली. काही ग्रामस्थांनी झाडे तोडणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. अद्याप या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाही. ही जागा सिडकोच्या मालकीची आहे, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. परंतु अद्याप सिडकोच्या वृक्षप्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
कळंबोली गावामध्ये पुना पॉइंट या बंद लॉजिंग-बोर्डिगच्या मागील बाजूस ही पाच गुंठे जागा आहे. याच जागेवरील ताबा कब्जा वादातून या वृक्षांची कत्तल झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. येथे आंबा, जांभूळ, चिंच व नारळाचे वृक्ष होते. गावातील कडव आणि चौधरी कुटुंबाचा या जागेवरील बांधकामात काही दिवसांपूर्वी वाद झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शुक्रवारी रात्री या वादग्रस्त जागेवर एका टेम्पोतून पंधरा जण कुऱ्हाडी, कोयता व दोरखंड घेऊन ही वृक्षे मुळापासून काढण्यात आली. तर काहींना बुंद्यापर्यंत कापण्यात आले. रातोरात येथील वृक्षांची कत्तल केल्यावर हा सर्व प्रकार ग्रामस्थांना कळाला. त्यानंतर वृक्षतोडय़ांना पोलिसात नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील झाडे तोडणारे हे खारघर फणसवाडी येथून बोलाविण्यात आले होते. तर काही जण कळंबोली मजूरनाक्यावरून आणण्यात आले होते. संबंधित जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याबाबत पोलीस शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी सांगितले. तसेच ज्या कोणी हा वृक्षतोडीचा प्रकार केला आहे त्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मोहिते यांनी सांगितले.