कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा १५ वा वर्धापन दिन कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त जपान येथील विविध बौद्ध विहारातील प्रमुख भंतेंच्या विशेष उपस्थितीत बुद्धवंदना व धम्मदेसनाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जपान येथील आंतरराष्ट्रीय निचिरेन-शु बुद्धिस्ट फेलोशिपचे अध्यक्ष भदंत कानसेन मोचिदा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भदंत इशी वातानाबे, भदंत जिकेई मत्सुमोटो, भदंत होशो सयतो, भदंत होनयो ओक्युनो, भदंत गिशो वातानाबे, भदंत इको नाकायामीया, भदंत इशुन कावासाकी, भदंत कइजु शिबाटा, भदंत गिकयो वातानाबे, भदंत शिनग्यो ईमाई, भदंत झेनशेइ, भदंत निबेकेताई कोयझुमी, भदंत कोयु मोत्सुमारी, भदंत चिडो युचीयामा, भदंत शुनको योशिनो, भदंत क्योशो फुजीइ, बिशो नागाशे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेसच्या संचालिका माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसराच्या दहा एकर जागेत या पॅलेसची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर विशाल प्रार्थनागृहात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही अप्रतिम मूर्ती जपानतर्फे भेट देण्यात आली असून तिचे वजन ८६४ किलो एवढे आहे व ती चंदनाच्या लाकडापासून तयार करण्यात आली आहे. तळमजल्यावर वातानुकूलित सभागृह, सुसज्ज वाचनालय व भव्य संग्रहालय आहे. येथील शांतीपूर्ण वातावरण निर्मितीमुळे या परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मानवाला सुख, शांती, समाधान आणि दिव्य आनंदाची अनुभूती होते. या जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेसला गेल्या पंधरा वर्षांत भारतातील ५० लाखांच्यावर भाविकांनी भेट देऊन दर्शन घेतले आहे. तसेच विविध देशाच्या ३८ प्रतिनिधींनीसुद्धा भेटी दिल्या.
जपानमध्ये दोनशे प्रमुख बौद्ध विहार असून त्यांचे दोनशे प्रतिनिधी या समारंभास उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या वर्धापन दिनाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही अ‍ॅड. कुंभारे यांनी याप्रसंगी केले. पत्रकार परिषदेला जपान येथील भंते शिनग्यो ईमाई व झिंगो एनाय उपस्थित होते.