नागपूर ग्रामीण पोलिसांनी गेल्या दोन दिवसात अठरा ठिकाणी छापे मारून अवैध दारू विकणाऱ्या २० आरोपींना अटक करून सुमारे सुमारे सातशे लिटर दारू जप्त  व नष्ट केली. आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच विविध ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली रोज छापामार कारवाई सुरू आहे.
केळवद पोलिसांनी बुधवारी केळवदपासून २५ किलोमीटर अंतरावरील टेंगळी येथे छापा मारून सहा आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून ५३० लिटर मोहाची दारू जप्त केली. केळवदपासून २२ किलोमीटर अंतरावरील तेलगाव येथे छापा मारून प्रत्येकी १८० मिलीच्या ५ बाटल्या देशी दारू जप्त करून एका आरोपीस अटक केली.  केळवद गावाजवळ प्रत्येकी १८० मिलीच्या दहा बाटल्या देशी दारू जप्त करून एका आरोपीस अटक केली. देवलापार पोलिसांनी पाच किलोमीटरवरील सावळा येथे छापा मारून वीस किलो मोहफुलाचा सडवा जप्त करून एका आरोपीस अटक केली. नरखेडमधील सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या झोपडपट्टीत नरखेड पोलिसांनी छापा मारून दहा लिटर मोहफुलाची दारू जप्त करून एका आरोपीस अटक केली. बोरगाव धुरखेडा येथे कळमेश्वर पोलिसांनी छापा मारून एका महिलेजवळून प्रत्येकी १८० मिलीच्या ९६ बाटल्या देशी दारू जप्त करून अटक केली. खापरखेडा येथे खापरखेडा पोलिसांनी छापा मारून अडीच हजार मिलि देशी दारू जप्त करून एका आरोपीस अटक केली.