शिष्टमंडळाशी नव्हे तर रिक्षाचालकांशी चर्चा करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी कायम ठेवल्याने गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा खटका उडाला. त्यातून मोर्चाव्दारे आलेले रिक्षाचालक, संतप्त होऊन वाद घालू लागल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. सुमारे २०० हून अधिक रिक्षाचालकांना शालिमार सभागृहात अटक करून ठेवण्यात आले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.     
कोल्हापूर शहरातील रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी आठ संघटनांच्यावतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सासने मैदान येथून सुरू झालेला मोर्चा महादेव मंदिर, बसस्थानक, दाभोळकर कॉर्नरमार्गे प्रादेशिक पहिवहन कार्यालयावर पोहोचला. इलेक्ट्रॉनिक मीटरकरिता शासनाने कर्जद्यावे, थांबविण्यात आलेले परमीट सुरू करावे, परवान्याचे प्रश्न मार्गी लावावेत, रिक्षाचालकांना निवृत्ती वेतन, प्रॉ.फंड, पिवळी शिधापत्रिका मिळावी आदी मागण्यांचे फलक रिक्षाचालकांनी घेतले होते. तशा घोषणा दिल्या जात होत्या. रिक्षाचालक मोर्चाव्दारे परिहवन कार्यालयात येणार असल्याचे पत्र २० दिवसांपूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी आटोळे यांना देण्यात आले होते. मात्र आटोळे रजेवर होते. ते अनुपस्थित असल्याने सहाय्यक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांनी रिक्षाचालकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी रिक्षाचालकांच्या मुख्य प्रतिनिधींना चर्चेसाठी त्यांच्या कक्षात बोलावून घेतले.     
तथापि रिक्षाचालकांच्या आठ संघटना, त्यांचे पदाधिकारी व रिक्षाचालक यांना चर्चेचा तपशील समजला पाहिजे, अशी मागणी करीत त्यांच्या प्रतिनिधींनी मुख्य सभागृहात बैठक घेण्याची मागणी केली. त्यास नकार मिळाला. त्यामुळे रिक्षाचालक संतप्त झाले. त्यांच्याकडून घोषणाबाजी होऊ लागली. चर्चेऐवजी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रतन रजपूत यांनी आंदोलकांना अटक केली. सोमवारी आटोळे कार्यालयात हजर राहिल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.    
अटक करण्यात आलेल्या बाबा इंदूलकर, राजू जाधव, नितीन दुधगावकर, राजेंद्र पाटील, मोहन बागडी, दिलीप मोळे, चंद्रकांत भोसले आदींचा समावेश होता. या आंदोलनात कॉमन मॅन, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटना, कोल्हापूर शहर रिक्षाचालक संघटना, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटना, शेअर-ए रिक्षासंघटना, हिंदुस्थान अ‍ॅटो संघटना, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघ आदींचा समावेश होता.