मुंबईचा उपनगरीय रेल्वे प्रवास महिलांसाठी सुरक्षित असल्याचे, अगदी काही वर्षांपर्यंत सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गेल्या दोन-चार वर्षांमध्ये ही परिस्थिती प्रचंड पालटली आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार महिलांसाठी केवळ रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पादचारी पूल एवढय़ाच जागा असुरक्षित नसून खास त्यांच्यासाठी राखीव असलेल्या डब्यांमध्येही त्यांची सुरक्षा टांगणीलाच लागलेली असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २५ हजारांहून अधिक पुरुष प्रवाशांना पकडून दंड ठोठावण्यात आला. म्हणजेच दर दिवशी तब्बल ७० पुरुषांना महिला डब्यातून प्रवास करताना पकडले होते. तर यापकी ३६९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यंदा केवळ जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांतच हा आकडा पाच हजारांच्या आसपास पोहोचला आहे.महिलांच्या डब्यात पुरुष प्रवाशांनी प्रवास करू नये, अशी उद्घोषणा वारंवार केली जाते. त्याचप्रमाणे महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी खास लोहमार्ग पोलीसही तनात असतात. तरीही महिला डब्यात पुरुष प्रवाशांनी प्रवास करण्याच्या घटना वारंवार घडतात. अनेकदा यातून बलात्कारासारखे गुन्हेही घडले आहेत. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दल यांनी एकत्रितपणे आणि स्वतंत्र प्रयत्न करूनही या परिस्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही.गेल्या वर्षी, म्हणजे २०१४ मध्ये मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या ‘महिला शक्ती’ पथकाने महिला प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २५,५७२ प्रवाशांना पकडले. त्यापकी ३६९ पुरुष प्रवाशांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यात विनयभंग, अत्याचार अशा गुन्ह्य़ांचाही समावेश आहे. महिला डब्यात प्रवास करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना समज देऊन सोडून देण्यात आले. महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडल्या जाणाऱ्या पुरुषांची संख्या या वर्षांत सरासरी ७० एवढी जास्त होती. यंदा जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मिळून महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांची संख्या साडेचार हजारांच्या आसपास आहे. यंदा या दोन महिन्यांत ४४६५ पुरुष प्रवाशांना पकडण्यात आले. गेल्या वर्षांशी तुलना केल्यास हा आकडा दरदिवशी ७५ एवढा आहे, तर गुन्हा दाखल झालेल्या पुरुष प्रवाशांची संख्या ५२ एवढी आहे.दरम्यान, पुरुषांनी महिला डब्यांतून प्रवास करू नये, यासाठी जनजागृतीची मोठी गरज आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून ही समस्या सुटणार नाही. अनेकदा घाईगडबडीत एखादा पुरुष महिलांच्या डब्यात चढतो. पण अशा घटना खूपच कमी वेळा घडतात. त्यामुळे मुद्दामहून महिला डब्यांतून प्रवास करणाऱ्या पुरुषांवरील ही कारवाई चालूच राहील, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी सांगितले.