शहराजवळील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबेजळगाव येथील टोल नाका सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आठ-दहा दरोडेखोरांनी लुटला. तलवारीचा धाक दाखवून सातजण टोल वसुली करणाऱ्या व्यक्तीजवळ गेले आणि त्याच्याकडून ३ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम पळविली. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहाटे साडेपाचच्या सुमारास टोलनाक्यावरील रक्कम लुटण्यास आलेल्या सातजणांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडले. ज्या कॅमेऱ्यामध्ये छायाचित्रण झाले, तो व्हीसीआरदेखील ताब्यात घेतला. रोख ३ लाख ९४ हजारांची रक्कम व दोन मोबाईल असा ऐवज लुटून ते तवेरा मोटारीतून पळून गेले. ही मोटार तुर्काबादच्या दिशेने गेल्याचे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितले. ग्रामीण पोलीस मुख्यालयातून नाकाबंदी करण्यात आली. हे लुटारू नंतर सिल्लेगावकडे पळाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान सिल्लेगावजवळील शिवारात गाडी व १ लाख ४३ हजारांची रक्कम तशीच टाकून दरोडेखोर पळाले. पाठीमागच्या रस्त्यावरून व पुढूनही पोलीस येत असल्याचे लक्षात आल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.