जिल्हय़ात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन लोकसहभागातून अभिनव उपक्रम राबविणार आहे. टंचाईग्रस्त गावांतील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हय़ात जवळपास ४०० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, परभणी जिल्हा बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख, उद्योजक ओमप्रकाश डागा, नंदकिशोर अग्रवाल आदी उपस्थित होते. सध्या जिल्ह्य़ात ९ टँकर सुरू असून मे व जूनअखेर बहुतांश गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यातच टँकरचे पाणी गावातील विहिरीत टाकल्यास ते गढूळ होते. या पाश्र्वभूमीवर टंचाईग्रस्त गावांत लोकसहभागातून २ हजार लीटर क्षमतेच्या ४०० टाक्या बसविण्यात येणार आहेत. गावच्या लोकसंख्येप्रमाणे या टाक्या देण्यात येणार असून, कमी लोकसंख्येच्या गावात एक व जास्त लोकसंख्येच्या गावात दोन टाक्या देण्यात येतील. ठराविक जागेवर मजबुतीकरण करून या टाक्या बसविण्यात येतील. प्रत्येक टाकीला दोन नळ राहणार असून जिल्हा प्रशासनातर्फे या टाक्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात पाण्याच्या टाक्या बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जवळपास ३० लाखांचा निधी लोकसहभागातून जमा करण्यात येणार आहे. बैठकीत बांधकाम असोसिएशनकडून जवळपास अडीच लाख, जिल्हा जिनिंग प्रेसिंग असोसिएशनतर्फे २ लाख, बडोदा बँकेकडून १ लाख ९२ हजार, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनकडून १ लाख, किराणा असोसिएशन, अग्रवाल समाज, वाल्मीकी बँक पाथरी यांच्याकडून प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच या उपक्रमासाठी बुलडाणा अर्बन बँक, हिंगोली पिपल्स, जिंतूर अर्बन बँक, लायन्स क्लब आदींकडून आर्थिक मदत मिळणार आहे. उर्वरित निधी परभणी जिल्हा सहकारी बँकेकडून दिला जाईल, असे बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी जाहीर केले.