गेली २० वर्षांहून अधिक काळ नायर रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागात आठवी उत्तीर्ण असलेले ४१ कर्मचारी ‘तंत्रज्ञ’ रक्तचाचण्या करीत आहेत. त्यासाठी त्यांनी पालिकेने दिलेले प्रशिक्षण वेळोवेळी इमानेइतबारे पूर्ण केले आहे. मात्र या मंडळींना पदोन्नतीचे मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत. त्यातच पालिकेच्या संस्थांमधून ‘डीएमएलटी’ (डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना ‘तंत्रज्ञ’ म्हणून नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र प्रशासन एकूणच ‘तंत्रज्ञ’ पदाबाबत उदासीन आहे. परिणामी पॅथॉलॉजी विभागाचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.
अनेक वर्षांपूर्वी पालिका रुग्णालयांमध्ये आठवी उत्तीर्ण झालेल्याला भरती केले जात असे. पुढे प्रशिक्षण घेऊन ते पॅथॉलॉजी विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत झाली. नायर रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागात मोठय़ा प्रमाणावर रक्तचाचण्या करण्यात येत असल्याने या विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण केलेले सेवक तंत्रज्ञ म्हणून या विभागात कार्यरत होते. कालौघात त्यापैकी बहुसंख्य तंत्रज्ञ सेवानिवृत्त झाले. मात्र सेवक म्हणून पालिकेत भरती झालेले आणि नंतर प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञ बनलेले ४१ जण आजही नायरच्या पॅथॉलॉजी विभागात काम करीत आहेत. रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण, बाह्य़रुग्ण आदींच्या रक्तचाचण्या पॅथॉलॉजी विभागात केल्या जातात. या विभागात सध्या ५७ तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यरत असलेल्या ४१ तंत्रज्ञांवर सध्या कामाचा प्रचंड ताण पडत आहे.
 पालिका प्रशासनाने बीएस्सी उत्तीर्ण असलेल्यांची तंत्रज्ञ पदावर भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रक्रियेद्वारे आवश्यकतेपेक्षा फारच कमी उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. त्याचवेळी सेवेत कार्यरत असलेल्या आठवी उत्तीर्ण तंत्रज्ञांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन एक पदोन्नती देण्याचाही मानस प्रशासनाने जाहीर केला. त्यानुसार या तंत्रज्ञांनी प्रशिक्षण घेतले. पण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ते पदोन्नतीपासून वंचितच राहिले आहेत. यापैकी काही मंडळी निवृत्तीच्या जवळ येऊन ठेवली आहेत. निवृत्त होताना एखादी पदोन्नती मिळाली तर निवृत्तीवेतनात त्याचा लाभ होईल, अशी या कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु सनदी अधिकाऱ्यांच्या चक्रव्युहात ही मंडळी अडकली आहेत.महापालिकेच्या संस्थांमधून डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनाही तंत्रज्ञ म्हणून भरती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु त्याकडेही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच घटक चाचणी घेण्याची वेळ आली आहे, असा टोला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष सुनील चिटणीस यांनी लगावला आहे.