पालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीचे १२६ फोर-जी टॉवर बसविण्यावरून सध्या नवी मुंबईत रणकंदन सुरू असून नागरिकांना कॅन्सर होईल, या भीतीने टक्केवारीसाठी कॅन्सरचे भूत उभे केले जात असल्याचे समजते. जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोशिएशन आणि सर्वोच्च न्यायालयाने मोबाइलच्या विशिष्ट रेडिएशनमुळे कॅन्सर होत नाही असे अनेक वेळा स्पष्ट केलेले असतानाही फोर-जीचे टॉवर लागल्यानंतर सर्व नवी मुंबईकरांना एका दिवसात कॅन्सरची लागण होईल, असे चित्र नवी मुंबई पालिकेतील काही नगरसेवक रंगविण्यात मश्गूल आहेत. नवी मुंबईत सध्या ८०० पेक्षा जास्त मोबाइल टॉवर असताना हा प्रश्न यापूर्वी नगरसेवकांनी कधी उपस्थित केला नाही.
नवी मुंबई पालिकेत सध्या नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप विरोधक वेळोवेळी करीत आहेत. सध्या आयटी क्षेत्रासाठी संबंधित असणारे दोन प्रस्ताव चांगलेच वादग्रस्त ठरले असून पालिका पेपरलेस करण्याच्या दृष्टीने आणण्यात आलेला अजेंडा मॅनेजमेंटचा ७८ लाखांचा प्रस्ताव गेल्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला, पण हा प्रस्ताव मान्य करताना सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांना अपमानित करण्यात आले. या प्रस्तावावर त्यांना बोलू न देता त्यांच्या कनिष्ठ अभियंत्याला बोलण्याचा आग्रह धरण्यात आला. या निविदेत स्थायी समिती सदस्यांच्या एका मुलाने भाग घेतला होता. ७८ लाखांचे हे काम त्यांना वाढवून एक कोटी दहा लाखांला हवे होते. ते देण्यास या अधिकाऱ्याने विरोध केल्याने त्यांना अपमानित करण्यात आले. या प्रकरणात या कामाच्या ठेकेदाराने ज्या ठिकाणी लक्ष्मीचा प्रसाद चढवायचा होता ते चढवल्यानंतरही स्थायी समितीत तमाशा करण्याचे नाटक बेमालूमपणे वटविण्यात आले. अपमानित झालेल्या राव यांनी नंतर आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्यासमोर दुसऱ्या दोन सहकारी अधिकाऱ्यांवर तोफ डागली. या दोन अधिकाऱ्यांना सोडून हा नगरसेवक मला लक्ष का करीत आहे असा सवाल यावेळी राव यांनी विचारला. या प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे नगरसेवकांना १२० टॅबलाइड पीसी मिळणार आहेत. हे प्रकरण शांत होत नाही तोच मंगळवारी महासभेत फोरजी टॉवर उभारण्यास रिलायन्सला परवानगी देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यावेळी अनेक नगरसेवकांनी थयथयाट केला. फोरजीमुळे इंटरनेट सेवा जलद होणार आहे.
रिलायन्सचे मुख्यालय नवी मुंबईत असल्याने त्यांनी देशात या शहरापासून फोरजी टॉवर उभारण्यास सुरुवात करण्याचे ठरविले आहे. १२६ टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी येथील एका बडय़ा नेत्याला रोड मॅपच्या नावाखाली रिलायन्सने करोडो रुपये दिले असल्याची माहिती नवी मुंबईतील पाच पांडवांचेही हात याप्रकरणी ओले करण्यात आले. (सभागृहातील पाच बोलघेवडे नगरसेवक-ज्यांना प्रत्येक कंत्राटदार न चुकता लक्ष्मी भोग चढवीत असतो) त्यांना इतकी रक्कम देण्यात आली आहे तर आम्हाला का नाही, असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला असून त्यात राष्ट्रवादीच्या नगरसवेकांचा समावेश आहे. त्यातील एक नगरसेवक लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला ठेंगा दाखविणार आहे. आपल्या नागरिकांच्या आरोग्यविषयी अत्यंत जागृत असणाऱ्या अमेरिका, इंग्लंडमध्ये फोरजीचे टॉवर लावण्यात आले असून त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तसेच भारताच्या दूरसंचार मंत्रालयाने काही नियम घालून दिले आहेत.
जगात फोर-जी टॉवर बसविण्यासाठी एक मीटरच्या परिघातात दहा व्ॉट रेडियशन ग्राह्य़ मानण्यात आले आहे. भारतात हे समीकरण एक व्ॉट प्रति चौरस मीटर ठेवण्यात आले आहे. या टॉवरमुळे कॅन्सर होतो असे कोणत्याही आरोग्यविषयक संघटनेने ठामपणे सांगितलेले नाही. या टॉवर संदर्भात कोणताही तक्रार असल्यास दूरसंचार विभागाने एक संकेतस्थळ ठेवले असून त्यावर चार हजार रुपये भरून ती करता येते.
शहरात अगोदरच टू आणि थ्री जी साठी ८०० पेक्षा जास्त टॉवर असताना या एकाच कारणास्तव कॅन्सर झाल्याची कुठेही नोंद नाही. तरीही नवी मुंबई पालिकेतील नगरसेवक आपल्या अकलेचे तारे तोडत असून ते केवळ फोरजीच्या टॉवरवर बसलेल्या टक्केवारी नावाच्या भुतासाठी असल्याची चर्चा आहे.