Untitled-1
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणगाव चौफुलीजवळ सोमवारी पहाटे एका वाहनाला मिहद्रा एक्सयूव्ही धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच डॉक्टर ठार तर एक  जण जखमी झाल्याच्या घटनेने महामार्गावरील असुरक्षित वाहतुकीवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. मृत व जखमी झालेले सर्व डॉक्टर पिंपळगाव बसवंतचे होते. महिंद्रा मोटार कंटेनरला धडकली की खासगी आराम बसला याबाबत संदिग्धता आहे. अपघातानंतर संबंधित वाहनाने पोबारा केला. महामार्गावरील पिंपळगाव ते नाशिक या टप्प्यात वेगवेगळ्या अपघातांत सप्ताहात नऊ जणांना प्राण गमवावे लागले. विस्तारीकरणामुळे धुळे-नाशिक-मुंबई प्रवासातील अवरोध दूर झाले. तथापि, महामार्गावरील काही बाबी अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.
नाशिक येथे वैद्यकीय कंपनीच्या बैठकीसाठी रविवारी पिंपळगाव बसवंत येथील डॉक्टर मंडळी आली होती. रात्री उशिराने बैठक संपल्यावर ते मिहद्रा एक्सयूव्हीने माघारी निघाले. रस्त्यात ओझर येथे त्यांनी एका रुग्णालयास भेट दिली. येथून निघाल्यावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांच्या मोटारीच्या पुढे अज्ञात वाहन जात होते. हे वाहन कंटेनर की खासगी आराम बस याबद्दल संदिग्धता आहे. कोकणगाव चौफुलीवर गतिरोधक पाहून संबंधित वाहनाने अचानक ‘ब्रेक’ मारून गती कमी करण्याचा प्रयत्न केला आणि ही बाब मागुन भरधाव येणाऱ्या वाहनासाठी जीवघेणी ठरली. महिंद्रा एक्सयूव्ही थेट त्या वाहनाच्या मागील बाजूने आत घुसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, भक्कम दिसणाऱ्या मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सूरज साहेबराव पाटील (४०), हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तिवारी (४७), प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप शेळके (४६), डॉ. कुंदन जाधव (३४) आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर भास्करराव गांगुर्डे (४५) यांचा मृत्यू झाला. डॉ. उमेश भोसले हे जखमी झाले. जखमी भोसले हे कसे तरी कारमधून बाहेर पडले आणि त्यांनी इतरांना या घटनेची माहिती दिली.
अपघातग्रस्त मोटारीतुन इतर डॉक्टरांना बाहेर काढण्यासाठी दरवाजे कटरच्या साहाय्याने कापावे लागले. या घटनेची माहिती पहाटे पिंपळगावमध्ये धडकली. तेथून नातेवाईक व ग्रामस्थांनी कोकणगाव आणि आरोग्य केंद्रात धाव घेतली. कोकणगाव फाटा पिंपळगावपासून केवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. या चौफुलीवरून निफाड साखर कारखाना व कोकणगावकडे जाण्यासाठी रस्ता आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी येथे गतिरोधक तयार करण्यात आला आहे. महामार्गावरून मार्गस्थ होणारे वाहनधारक तसेच स्थानिकांना अद्याप त्याची पुरेशी कल्पना नाही. हा गतिरोधक लक्षात न आल्यामुळे अपघात घडल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया होती. सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या अधिकारी दीपा दराडे यांनी धाव घेऊन अपघातस्थळाची पाहणी केली. या वेळी स्थानिकांनी दराडे यांना घेराव घालून धारेवर धरले. या चौफुलीवर दररोज अपघात घडत असून ते थांबविण्यासाठी भुयारी मार्ग वा तत्सम व्यवस्था करण्याची मागणी केली. महामार्गावरून भरधाव वाहने मार्गक्रमण करतात. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कृषीमालाची वाहतूक करणाऱ्या मालमोटारी व टेम्पोंची संख्या मोठी आहे. या स्थितीत महामार्ग ओलांडणे वाहनधारक व पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचनामा झाल्यानंतर अपघातग्रस्त मोटार हलविण्यात आली. दरम्यान, विस्तारीकरण झाल्यापासून महामार्गावर वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण राखले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर गाव असणाऱ्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तो या अपघाताचे कारण ठरल्याचे निदर्शनास आले.
अपघात कमी करण्याचा प्रयत्न
स्थानिकांच्या मागणीनुसार कोकणगाव चौफुलीवर गतिरोधक बसविण्यात आला आहे. या गावाची लोकसंख्या कमी असल्याने आणि चौफुलीवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक नसल्याने या ठिकाणी भुयारी मार्गाचा विचार झाला नाही. याआधी स्थानिकांनी तशी मागणी केलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग, उड्डाणपूल करण्याची मागणी केली जात आहे. जिथे खरोखर निकड आहे, तिथे पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, सर्व ठिकाणी ही व्यवस्था करणे अवघड असते. महामार्गावर स्थानिकांसाठी काही ठिकाणी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे, काही ठिकाणी काम प्रस्तावित आहे. कोकणगाव चौफुलीवर याआधी अपघाताची घटना घडलेली नव्हती. गतिरोधक बसविले तरी स्थानिक त्यांची संख्या वाढविण्याची मागणी करतात. अनेकदा या मागणीची पूर्तता करावी लागते.
– पी. जी. खोडस्कर
(राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण)