News Flash

बुलढाणा जिल्ह्य़ातील ५६ प्रकल्प कोरडे

पाण्याअभावी शेवटच्या घटका मोजत असलेले प्रकल्प, दिवसागणिक खोल जात असलेले भूगर्भातील पाणी, तळाला लागलेल्या विहिरी व बंद पडलेल्या बोअरवेल अशी जिल्ह्य़ाची विदारक परिस्थिती आहे.

| April 12, 2013 04:22 am

पाण्याअभावी शेवटच्या घटका मोजत असलेले प्रकल्प, दिवसागणिक खोल जात असलेले भूगर्भातील पाणी, तळाला लागलेल्या विहिरी व बंद पडलेल्या बोअरवेल अशी जिल्ह्य़ाची विदारक परिस्थिती आहे. जिल्ह्य़ातील दोन मध्यम प्रकल्पांसह ५६ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत जिल्ह्य़ातील ११२ गावांमध्ये १३९ टँकर नागरिकांची तहान भागवत आहेत. जिल्ह्य़ाच्या अध्र्याअधिक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाच्या दाहकतेसोबतच नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सर्वात भीषण पाणीटंचाई सिंदखेडराजा व देऊळगावराजा शहरात निर्माण झाली असून, या दोन्ही शहरांची तहान ४५ टँकर भागवित आहेत. तर ११२ गावांना १३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.  तब्बल ४७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दिवसागणिक टँकरच्या संख्येत वाढ होत प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. अजून उन्हाळयाचे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे पुढे काय होईल, या भीतीने नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे.
यावर्षी जळगाव जामोद व संग्रामपूर हे दोन तालुके वगळता इतर अकराही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी प्रकल्पात पाहिजे तसा जलसाठा नाही. जानेवारी महिन्यातच दोन मध्यम प्रकल्पांसह ५६ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्प वगळता बहुतांश प्रकल्प हे शेवटच्या घटका मोजत आहेत. परिणामी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्य़ाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. सर्वात वाईट स्थिती मातृतीर्थ सिंदखेडराजा व देऊळगावराजात निर्माण झाली आहे.
 सिंदखेडराजा शहराला १५ व देऊळगावराजा शहराला २८ टँंकरने  पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बुलढाण तालुक्यातील २९ गावांना ४७, चिखली १४ गावे १६ टँकर, मेहकर ३ गावे ३ टँकर, लोणार २ गावे २ टँकर, खामगाव १० गावे १० टँकर, मलकापूर ५ गावे १० टँकर, नांदुरा ७ गावे ५ टँकर तर मोताळा तालुक्यातील २६ गावांना २९ टँकरने पाणी पुरवठा करण्यात सुरू आहे. प्रशासनाने ४७४ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यामध्ये बुलढाणा तालुका ७५, चिखली ८२, देऊळगांवराजा ५१, मेहकर ३० , लोणार ११, सिंदखेडराजा ८०, खामगाव २९, मलकापूर २०, मोताळा २५, नांदुरा ३३ व शेगांव आणि संग्रामपूर तालुक्यातील प्रत्येकी नऊ विहिरींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 4:22 am

Web Title: 56 project dry in buldhana district
टॅग : Drought,Dry
Next Stories
1 पदवीदान समारंभाला याकूब मेमन मुकणार
2 पीडब्ल्यूडी भ्रष्टाचाराच्या याचिकेवर राज्य सरकारला दाखलपूर्व नोटीस
3 अकोला महापालिकेत ‘आरसीएच’मध्ये अनियमितता
Just Now!
X