उरण नगरपालिकेने उरण शहरातील एकूण ८८ धोकादायक व जीर्ण इमारतींना धोकादायक ठरविले आहे. रहिवाशांनी या इमारती रिकाम्या कराव्यात, अशा नोटिसा पालिकेला बजावल्या आहेत. मात्र त्यापैकी शांती निवास या केवळ एका इमारतीतील रहिवाशांनी इमारत सोडली असून उर्वरित इमारतींतील रहिवाशी धोकादायक स्थितीत राहात आहेत. यापैकी शहरातील वाणी आळीमधील एका धोकादायक यादीतील इमारतीचे छत कोसळल्याने त्या घरातील मुलीच्या डोक्याला पाच टाके पडल्याची घटना घडली होती, तर एका इमारतीचा जिना कोसळण्याचीही घटना घडली होती. त्यामुळे उरण शहरातील नगरपालिकेने निश्चित केलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे.
ठाण्यातील इमारत दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यापूर्वी उरण नगरपालिकेने उरण बाजारपेठ, मोहल्ला, मोरा तसेच कोटनाका यासह एकूण ८८ इमारतींना नगरपालिका कायद्याच्या १९५ कलमानुसार घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे अभियंता झुंबर माने यांनी दिली. या नोटिसा इमारतीचे मालक तसेच इमारतीतील भाडेकरूंना देण्यात आल्या आहेत. या नोटिसीनुसार धोकादायक इमारत कोसळून अपघात, नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास नगरपालिका जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या भाडेकरूंना पर्यायी जागा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या जागेत तात्पुरती व्यवस्था करण्याचीही तयारी उरण नगरपालिकेने दर्शविली आहे. मात्र, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे इमारती धोकादायक असूनही अनेक रहिवाशी जीव मुठीत धरून राहात आहेत. अशा इमारतींना पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापनाने या इमारतींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांनी दिली.