डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूलचा शताब्दी महोत्सवाचा मुख्य समारंभ शनिवारी (दि. २२) पद्मभूषण रघुनाथ माशेलकर व पद्मश्री लिला पुनावाला यांच्या उपस्थितीत होणार आहे.
याबाबत पत्रकारांना माहिती देताना शालेय समितीने अध्यक्ष डॉ. संजीव गोखले म्हणाले, द्रविड हायस्कूल वाई या प्रशालेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही संस्थेच्या जीवनात शंभर वर्षांची वाटचाल ही नोंद घेण्यायोग्यच घटना होय. १ सप्टेंबर १८८५ मध्ये विष्णू गणेश वाकणकर यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल, वाई या नावाची शाळा स्थापन केली. १९०७ ते १९१० ही वर्षे शाळेला अडचणीची गेली. त्यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेला शाळा ताब्यात घेण्याचे आवाहन केले. परंतु त्यावेळी ७५ हजार कायम फंड व ६० हजार रुपये इमारत फंड असल्याशिवाय शाळा ताब्यात घेण्यास संस्थेने नकार दिला.
त्यावेळी वाईकरांनी ही रक्कम जमविण्याचे प्रयत्न केले पण अपुरे राहिले. त्यावेळी दानसागर गणपतराव द्रविड यांनी मृत्युपत्रानुसार शाळेस वार्षिक एक हजार मिळतील अशी व्यवस्था केली. सरस्वती द्रविड यांनी आपले स्त्रीधन शाळेला दिले. त्यानंतर १९२६ साली शाळेला जागा हवी म्हणून भिकाजीपंत द्रविड यांनी एक वाडा खरेदी करून बांधून दिला. त्यानंतर शाळेचे नामांतर द्रविड हायस्कूल असे करण्यात आले. तेव्हा रॅग्लर परांजपे उपस्थित होते.
१९८७ साली झालेला अमृतमहोत्सवाली तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा उपस्थित होते. तर सुवर्ण महोत्सवाला तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन उपस्थित होते. आजपर्यंत शाळेने समाजाला अनेक नामवंत विद्यार्थी दिले. त्यापैकी काही प्रमुखात पद्मश्री बी.जी. शिर्के, बांधकाम व्यावसायिक व्ही.एम. जोग, यमुताई किलरेस्कर, विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप, विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे, माजी राज्यमंत्री मदनराव पिसाळ, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र भट, संशोधक डॉ. सुलभा अध्यापक कुलकर्णी, अभिनेत्री सविता प्रभुणे, मुंबईचे माजी पालिका आयुक्त गिरीश गोखले, शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर, बी.जी. शिर्के कंपनीचे सीईओ जगन्नाथ जाधव,  पिंपरी चिंचवडचे पालिका सहआयुक्त अमृत सावंत, ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च बहुमान मिळविणारे जयंत बापट विनस्पायर सायर सॉफ्टवेअर्स (सिंगापूर) चे जितेंद्र कुलकर्णी आदी असंख्य विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
सध्या शाळेत २४ तुकडय़ा आहेत. शाळेने शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी, हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. संजय गोखले यांनी केले आहे.