डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवास जोरदार सुरुवात झाली असून विविध प्रकारच्या वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ यांच्या १२५ स्टॉल्सनी येथील परिसर पूर्णत: गजबजून गेला आहे. विविध प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने येथे नागरिक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करीत आहेत.
क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारासमोर आगरी महोत्सवाचा मागील दहा वर्षांचा इतिहास उलगडणारे साहित्य झळकवण्यात आले आहे. यात महोत्सवाला भेट देणाऱ्या विशेष व्यक्तींची छायाचित्रे, ‘लोकसत्ता’मधील बातम्यांची कात्रणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या विविध औषधांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. गॅसच्या वाढत्या किमतींमुळे विजेवर चालणाऱ्या शेगडय़ांच्या स्टॉलवरही नागरिक चांगलीच गर्दी करीत आहेत. तसेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या साहित्याचे स्टॉलही येथे आहेत. महिलांचा सहभागही यात कमी नाही. महिलांचे दागदागिने तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या स्टॉल्सला चांगला प्रतिसाद आहे. येथे उभारण्यात आलेल्या गाडय़ांच्या स्टॉलवर गाडय़ांची आवड असलेले उत्सुकतेने विचारपूस करताना दिसत आहेत. लहान मुलांसाठीही या महोत्सवात विशेष व्यवस्था करण्यात आली असून येथे उभारण्यात आलेल्या आनंदमेळाव्यात लहान मुले चांगलीच मजा करीत आहेत. आगरी पद्धतीच्या खास भोजनाचे स्टॉल्स खवय्यांसाठी पवर्णीच आहे. येथील भव्य अशा व्यासपीठावर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत.
  आजचे कार्यक्रम
१) सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२) ७.३० वाजता प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेला ‘उंच त्यांचा झोका’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हास्यकवी अशोक नायगांवकर, अभिनेत्री संजीवनी जाधव, हास्यकलाकार भालचंद्र कदम आणि बाल अभिनेत्री तेजश्री वालावलकर यांची लोककवी अरुण म्हात्रे मुलाखत घेणार आहेत.