करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या नियोजनात काही त्रुटी ठळकपणे दिसून आल्या याची कबुलीच मंदिर समितीच्या बैठकीत आज देण्यात आली. पुढील यात्रेच्या वेळी या त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मंदिराचे प्रभारी सचिव आणि निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस श्रीपूजक, महालक्ष्मी भक्त संघटना, पोलीस अधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते.     
यंदाचा उत्सव शांततेत पार पडला असला, तरी काही त्रुटी निदर्शनास आल्याचे अनेक सदस्यांनी या वेळी सांगत यातील सुरक्षेबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास एखादी गंभीर घटना घडण्याची भीती या वेळी काही सदस्यांनी व्यक्त केली. अनेकांनी मंदिरातील गोंधळ आटोक्यात यावा व कामाला शिस्त लावावी या दृष्टीने सूचना केल्या. श्रीपूजक बाबासाहेब ठाणेकर यांनी ओटी भरण्याचे साहित्य प्लास्टिक पिशव्यांतून देण्याऐवजी अन्य सुलभ पद्धतीने दिल्यास भाविकांचा देवीसमोर रेंगाळण्याचा वेळ वाचेल, अशी सूचना केली.     
महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी म्हणाले, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पितळी उंबऱ्यापासून दर्शन दिले जावे. ज्या भाविकांना ओटी भरायची आहे त्यांनाच देवीपर्यंत जाण्याची मुभा असावी. अति महत्त्वाच्या व्यक्तींचा दर्शन रांगेवर परिणाम होऊ नये, असे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. त्यावर संजय पवारांनी अति महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतला वेगळे न समजता सामान्य भाविकांप्रमाणेच दर्शन घेण्याची गरज व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर पडणाऱ्या रांगेमध्ये होणारे वाद टाळण्याची गरज व्यक्त केली. नवरात्रीत देवीची पालखी बाहेर पडतांना घाईगडबड होते. वर्षभर मंदिराकडे न फिरकणारे मानकरी या वेळी पुढे पुढे करीत राहतात. अशा उत्साही भाविकांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मिरवणूक मार्गाची योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीस देवस्थान समितीच्या पद्मजा तिवले, वाहतूक पोलीस निरिक्षक आर.आर.पाटील, अजित ठाणेकर आदी उपस्थित होते.