उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार दिघ्यामध्ये वाढत चालणाऱ्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार विकास पाटील यांचंी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तहसीलदारांनी पालिका, सिडको, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी दिघामध्ये अनधिकृत बांधकामाची पाहणी केली.
यावेळी तीन अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तर सहा बांधकाम पूर्ण झालेल्या अनधिकृत इमारतीत नागरिक राहण्यासाठी आले असल्याने या बांधकामाचा अहवाल बनवून तो उच्च न्यायलयात सादर करण्यात येणार आहे, असे तहसीलदार विकास पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसी, सिडको व पालिकेच्या अधिकाऱ्यांना यापुढे अनधिकृत बांधकामे होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी असे आदेश पाटील यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव, एमआयडीसीचे उपअंभियता अनिश माळी व सिडकोचे व्ही.बी.जोशी उपस्थित होते.