सार्वजनिक वापराच्या पार्किंग जागा आपली जहाँगीर असल्यासारख्या वापरणाऱ्या नवी मुंबईतील हॉटेल, मॉल यांना चाप लावण्याचे सिडको प्रशासनाने ठरविले असून वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेल तुंगाने हडप केलेली पार्किंग जागा काढून घेण्याची कारवाई सुरूकेली आहे. यासंदर्भात वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी सर्वप्रथम या जागा लाटण्याच्या षड्यंत्राविरोधात आवाज उठविला होता.
नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या जमिनींचा फार मोठय़ा प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी सेक्टर तीस येथे तुंगा हॉटेल प्रा. लि. या हॉटेल साखळी चालविणाऱ्या व्यवस्थापनाला हॉटेल उभारण्यासाठी विस्तीर्ण असा भूखंड दिलेला आहे. हॉटेलच्या जागेतच पार्किंगची व्यवस्था करण्याची अट पालिकेने घातलेली आहे. तुंगा हॉटेलसमोर सिडकोच्या मोकळ्या जागा आहेत. त्यातील आठ हजार चौरस मीटरची जमीन या हॉटेलला भाडेपट्टय़ावर देण्यात आली होती. हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांबरोबरच जनतेच्या वाहनांनादेखील या जागेत पार्किंग देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते, पण हॉटेल व्यवस्थापनाने या जमिनीला रीतसर कुंपण घालून ही जागा त्यांचीच असल्याचा दिखावा तयार केला होता. त्याचबरोबर या ठिकाणी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांना सिडकोच्या निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारला जात असल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी पब्लिक पार्किंगला मज्जाव केला जात असल्याने या हॉटेलची मक्तेदारी असल्याचे चित्र होते. असाच प्रकार जवळच्या सेंटर वन मॉलने सुरू केला होता. त्यांच्या मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांना या पार्किंगमध्ये जागा दिली जात होती. इतर वाहनांना येथून हुसकावून लावले जात असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. वाशी रेल्वे स्थानकावर खासगी वाहन पार्किंग करून मुंबईत कामधंद्यानिमित्ताने जाणारे लाखो प्रवाशी आहेत. त्यामुळे या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या उभी राहू लागली आहे. हॉटेल मॉलच्या या दादागिरीविरोधात संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे नवी मुंबई पालिकेला या मॉलच्या व्यवस्थापनाला नोटीस ठोकावी लागली. भाडेपट्टय़ावर घेतलेल्या जमिनींचा अशाप्रकारे गैरवापर केला जात असल्याची तक्रार त्यानंतर ठाकूर यांनी सिडकोला केली आहे. त्याची दखल घेऊन सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी तुंगा हॉटेलला दिलेली आठ हजार चौरस मीटर मोकळी जागा काढून घेण्याची कार्यवाही सुरू केली असून ही जागा काढून का घेण्यात येऊ नये अशाप्रकारची नोटीस दिली आहे. सिडको या जागेवर स्वत:ची पार्किंग यंत्रणा राबविण्याचा विचार करीत आहे.
तुंगा हॉटेलसारखेच अतिक्रमण हॉटेल फोर्थ पॉइन्ट व इनऑर्बिट व्यवस्थापनाने केले असून समोरच्या रस्त्याचा भूखंड गिळंकृत केला आहे. साडेपाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड जापनीच पद्धतीचे उद्यान बनविण्याच्या अटीवर इनऑर्बिट व्यवस्थापनाला देण्यात आला होता, पण त्यांनी या भूखंडाचा वापर माल व हॉटेलमध्ये ये-जा करणाऱ्या ग्राहकांसाठी केलेला आहे. त्यासाठी तेथे डांबरीकरणाने रस्ता बनविण्यात आलेला आहे. हा भूखंड अशाप्रकारे हडप करण्यात आल्याने सिडकोचे करोडो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे, पण नागरिक एका चांगल्या उद्यानालादेखील मुकले आहेत. याविरोधात ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अशाप्रकारे अनेक हॉटेल आणि मॉल्सनी आपल्या आजूबाजूच्या जमिनी हडप केल्याची उदाहरणे आहेत.