नेचर क्लबचे उपोषण
चांदवड तालुक्यात बिबटय़ाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारी नेचर क्लब ऑफ नाशिकच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्य वन्यजीव संरक्षक यांना दिले.
चांदवड तालुक्यातील कोंबडेवाडी परिसरात राजेंद्र कासलीवाल यांच्या विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. पाण्यात गुदमरून बिबटय़ाचा मृत्यू झाला. वन विभागाच्या या कार्यवाहीत सहभागी झालेल्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून वन विभागाने चौकशी समिती नेमून कारवाई करावी, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिकने केली आहे. चार महिने उलटून कारवाई होत नसल्याने गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी बिबटय़ाच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, नेहरू उद्यानाचे खासगीकरण करू नये, पक्षी अभयारण्याचे कार्यालय नांदूरमध्यमेश्वरला स्थलांतरित करावे, नाशिकला रेस्क्यू सेंटर तयार करावे, वन्यजीव पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, रेस्क्यू व्हॅनला वाहनचालक द्यावा, चांदवड घटनेची चौकशी करावी, जखमी पक्षी, साप यांच्या आश्रयाची व्यवस्था करावी आदी मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. या वेळी क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, सुचित जाधव, प्रमिला पाटील आदी
उपस्थित होते.