पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिल्याप्रकरणात दोषी आढळलेल्या तीन कर्मचाऱ्यांविरूद्ध चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यासाठी पथके गेली आहेत. या तिघांना पूर्वीच पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने निलंबित केले आहे.
अशोक रानवडे, रमेश शेलार (रा. विद्यापीठ कॉटर्स ) आणि चेतन परभाणे अशी गुन्हा दाखल झालेल्या त्या तीन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी परीक्षा नियंत्रक संपदा जोशी यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आमच्याकडे बावीस विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीवरून या कर्मचाऱ्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती चतु:श्रुंगीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी दिली.
पूना कॉलेजमधील डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट उघड झाल्यावर या प्रकरणात विद्यापीठाच्या गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण वाढवून दिले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विद्यापीठातर्फे माजी पोलिस अधिकारी शरद अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांनंतर आपला अहवाल विद्यापीठाकडे सादर केला होता. याप्रकरणात हे तीन कर्मचारी दोषी आढळून आल्यानंतर त्यांना तीन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. या तिघांवर गुन्हा दाखल करावा, असा अर्ज पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यावरून हा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस दोन शक्यता समोर ठेवून तपास करत आहेत. त्यामध्ये एक म्हणजे गुणामध्ये बदल हे गुण संगणकावर नोंद करताना केले आहेत किंवा उत्तरपत्रिकेवर केले आहेत. हे गुण उत्तरपत्रिकेवर बदलले गेले असतील तर यामध्ये या तिघांशिवाय आणखी काही लोकांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.