शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून सुरुवात केली. संयुक्त कारवाईच्या पहिल्याच दिवशी शिवाजीनगर एस. टी. स्थानकाचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. कारवाईला अनेक ठिकाणी विरोध झाला. मात्र, विरोध मोडून काढत कारवाई पूर्ण करण्यात आली.
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मुंबईत मंगळवारी शहरातील आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. वाहतुकीला अडथळे ठरणारी अतिक्रमणे महापालिकेने तातडीने हटवावीत तसेच अतिक्रमण कारवाईत जे अधिकारी योग्य प्रकारे काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. बैठकीतील आदेशानुसार महापालिका आणि पोलिसांनी शुक्रवारपासून धडक कारवाईला प्रारंभ केला. शिवाजीनगर येथे कारवाईला सुरुवात झाल्यानंतर जोरदार विरोध करण्यात आला. या कारवाईच्या वेळी सुमारे दोनशे ते तीनशे विरोधक कारवाई थांबवण्याची मागणी करू लागले. अचानक विरोध सुरू झाल्यामुळे या कारवाईसाठी गेलेल्या बिगारी सेवकांनी कारवाईदेखील थांबवली होती. त्यानंतर अतिक्रमण कारवाईत सहभागी होणाऱ्या सर्व सेवकांना एकसारखे टी शर्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात थांबलेली कारवाई सुरू झाली.
रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तसेच पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई शिवाजीनगरसह धनकवडी, हडपसर, लोहियानगर या भागात मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. दुकानदारांनी पदपथांवर लावलेले फलक तसेच केलेले बांधकाम या कारवाईत तोडण्यात आले.