इसबावी (पंढरपूर) येथील गट नं. १५चे बेकायदा केलेले वाटप अप्पर जिल्हाधिकारी काकडे यांनी बेकायदेशीर केलेले वाटप हा निर्णय रद्द न केल्याच्या निषेधार्थ धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दल अशा सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी चंद्रभागा नदीत जलसमर्पण केले अन् पोलिसांनी पाण्यात उतरून सर्वाना ताब्यात घेतले.
श्रमक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, प्रा. शिवाजी बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणग्रस्त व श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते हे चंद्रभागा नदीतील छातीएवढय़ा पाण्यात उतरले तेव्हा बंदोबस्ताकरिता आलेल्या पोलीस उपअधीक्षक प्रशांत कदम, शहर पोलीस निरीक्षक बाबासाहेब रेड्डी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
इसबावी येथील जमीन प्लॉट हे धरणग्रस्तांसाठी ३५ वर्षांपूर्वी वाटप केले असताना अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या जमिनीचे बेकायदेशीर वाटप केले. या प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला. परंतु अद्यापही ७/१२ची नोंद रद्द करण्यात आली नाही. जमीनवाटपाचा निर्णय रद्द करण्यात आला नाही आणि मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने धरणग्रस्तांनी जलसमर्पणाचा निर्णय घेतला आणि चंद्रभागेत उतरले असे मोहन अनपट यांनी सांगितले.