विधानसभा निवडणुकीला चार दिवस शिल्लक असताना ऐरवी विविध राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यालयांत दिसणारी लगबग गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. शिवाय उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये समर्थकांची गर्दी कमी झाली आहे.
पूर्वी विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांची तयारी ही त्या त्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयातून होत असे. प्रचारफेरीला निघण्याच्या अर्धा तास आधी कार्यकर्ते प्रचार कार्यालयात येत होते, मतदार आपापल्या भागातील प्रचार कार्यालयात जाऊन माहिती घेत. मात्र, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे घरबसल्या सगळी माहिती मिळत असल्यामुळे कार्यालयातील लगबग कमी झाली आहे. एसएमएस आणि व्हाटस् अ‍ॅपच्या माध्यमातून निरोप दिले जात असल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचार कार्यालयाकडे पाठ फिरवू लागल्यामुळे ऐरवी प्रचार कार्यालयात दिसणारी कार्यकर्त्यांंची गर्दी कमी झाली आहे. भाजपाचे गणेशपेठमध्ये मुख्य प्रचार कार्यालय असून त्याशिवाय टिळकपुतळा आणि धंतोलीमध्ये कार्यालये आहेत. मात्र, प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार कार्यालये सुरू केल्यामुळे मुख्य प्रचार कार्यालयाकडे कार्यकर्ते फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या देवडिया भवनात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशपेठेतील कार्यालयात आणि रेशीमबाग चौकातील शिवसेना कार्यालयामध्ये अशीच परिस्थिती आहे. मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना व्हाट्स अ‍ॅप किंवा एसएमएसच्या माध्यामातून निरोप दिले जात आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रचार कार्यालयात स्वतंत्र आयटी सेल सुरू केले आहे.  
निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षांतील उमेदवारांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी एसएमएस आणि व्हाट्स अ‍ॅपचा खुबीने वापर चालवला आहे. ‘एसएमएस’ तसेच रिंगटोनद्वारेही प्रचाराची आगळी पद्धत राबवली जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला मोबाईल प्रचाराचा खर्च देणे टाळता येत असल्याने आता मोबाईलचा अधिक वापर करण्यावर सर्वच पक्षांनी चांगलाच भर दिला आहे. गेल्या पाच सहा वर्षांत सोशल नेटवर्कच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी जास्तच जोर दिला आहे. विशेषत: फेसबुकच्या माध्यमातून उमेदवारही जनतेपर्यंत पोहचत आहे. प्रमुख तीन उमेदवारांचे छायाचित्र देऊन कोणाला एकाला तरी लाईक करण्यासंबंधी सांगितले जात आहे. जाहीर सभेचा निरोप असो की कुठल्या मतदाराला मतदान करायचे या सर्व गोष्टीसाठी मोबाईलचा वापर केला जात आहे. शहराचा वाढता परिसर बघता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे तुलनेने दिवस कमी असल्याने उमेदवारांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तसे शक्य नसल्याने निवडणुकीत आपल्या पक्षाची काय धोरणे आहेत, तसेच पक्षाचे प्रमुख नेते काय म्हणतात, या अर्थाचे संदेश प्रमुख कार्यकर्त्यांंमार्फत मतदारांना पाठविले जात आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या गाणी रिंगटोन म्हणून वाजविली जात आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणातील काही मुद्देही ‘एसएमएस’द्वारा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे. मोबाईल, ‘एसएमएस’चा खर्च या यंत्रणेवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेलाही सिद्ध करता येत नसल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांचे या सोशल मीडियाद्वारे सध्या तरी फावले आहे.