डिसेंबर महिन्यापासून मुंबईमध्ये आलेले थंडीचे वारे, रात्री हवेत जाणवणारा गारवा कितीही सुखकारक वाटत असला तरी अभिनेता राजेश खेरा याच्यासाठी मात्र हाच गारवा डोकेदुखी ठरला. मुंबईतील या वाढत्या थंडीपोटी राजेशला एक मालिका सोडावी लागली आहे. ‘सोनी पल’ वाहिनीवरील ‘सिंहासन बत्तीसी’ या मालिकेमध्ये वेताळाची भूमिका साकारणाऱ्या राजेशला थंडीमुळे मालिकेवर पाणी सोडावे लागले आहे.
‘सोनी पल’ वाहिनीवरील सध्या गाजत असलेली मालिका ‘सिंहासन बत्तीसी’ यामध्ये लवकरच राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांची गोष्ट सांगितली जाणार आहे. यासाठी निर्माते धीरजकुमार यांना उत्तम शरीरयष्टी असलेला अभिनेता वेताळ म्हणून हवा होता. शेवटी अनेक नटांमधून राजेश खेरा याची निवड झाली. दोन दिवसांचे चित्रीकरणही पार पडले होते. पण नंतर स्वत:हून राजेशने या मालिकेतून काढता पाय घेतला. यामागचे मुख्य कारण सध्या वाढत असलेली थंडी हेच असल्याचे मालिकेच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. वेताळ साकारत असताना राजेशला पवईच्या स्टुडिओमध्ये रात्रीच्या वेळी चित्रीकरण करावे लागत होते. त्यात हे सर्व चित्रीकरण आऊटडोअर होत असे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुटलेला वारा, गारठवणारा थंडावा राजेशला सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला.  आता मालिकेमध्ये राजेशऐवजी आभास मेहता वेताळाची भूमिका साकारणार आहे.