व्हॅट लागू करताना त्यानंतर पुन्हा कोणताही नवा कर लागू करणार नाही, असे आश् वासन शासनाने व्यापाऱ्यांना दिले होते. त्यामुळे आता एलबीटीचा आग्रह सोडून शासनाने आपला शब्द पाळावा, असे प्रतिपादन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी अंबरनाथ येथे केले.
अंबरनाथ येथील पूर्णिमा कबरे संचालित कमलधाम वृद्धाश्रमास रविवारी संध्याकाळी मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्थानिक संस्था करास भाजपचा विरोध असल्याचे सांगितले.
१ जानेवारीपासून देशभरातील मोबाइल सेवा रोमिंगमुक्त करण्याचे आश्वासन केंद्र शासनाने नागरिकांना दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही, याबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. वृद्धाश्रमाच्या विस्तारीकरण प्रकल्पापैकी पाच कक्ष बांधण्यासाठी निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते.