दारूबंदी आंदोलन सुरू असलेल्या या जिल्ह्य़ात दारूच्या विक्रीत तब्बल १३ टक्क्यांनी घसरण झाली असल्याची धक्कादायक माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. १ एप्रिलपासून देशी-विदेशी दारूच्या किमतीत वाढ झाल्याने व एलबीटीमुळे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दारू विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगत असलेल्या हा जिल्हा दारू विक्रीत विदर्भात नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्य़ात ३०० बीअर बार असून देशी-विदेशी दारूचे २५ वाईन शॉप व दारूभट्टय़ा आहेत. यामधून देशी दारू महिन्याकाठी ११ लाख बल्क लिटर विकली जाते. त्यापाठोपाठ विदेशी दारू ८ लाख व बीअर ५ लाख बल्क लिटर विकली जाते. आठ लाख कामगार असलेल्या या जिल्ह्य़ात देशी दारूची विक्री सर्वाधिक आहे, परंतु १ एप्रिलपासून दारू विक्री तब्बल १३ टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. श्रमिक एल्गारने पुकारलेल्या दारूबंदी आंदोलनामुळे दारू विक्रीवर परिणाम झाला काय, अशी विचारणा उत्पादन शुल्क अधीक्षक सुरेंद्र मनपियार यांना केली असता त्यांनी नाही, असे उत्तर दिले. दारूविक्रीत घसरण होण्यास मुख्य कारण या जिल्ह्य़ातील लोकांची खर्च करण्याची शक्ती कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यालाही विविध कारणे असल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहेत.
संपूर्ण दारूबंदीसाठी श्रमिक एल्गारचे आंदोलन सातत्याने सुरू आहे. या आंदोलनानंतरच शासनाने दारूबंदी समिती गठीत केली. त्याचा अहवालही समितीचे अध्यक्ष पालकमंत्री संजय देवतळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केला. दारूबंदी विषयावर विधानसभेत अर्धा तास चर्चा झाली, परंतु दारूबंदीचा निर्णय होण्यापूर्वीच जिल्ह्य़ात दारूविक्रीत १३ टक्क्यांची घसरण होण्यासाठी मुख्य कारण देशी-विदेशी दारूच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, हे ठरले आहे. १ एप्रिलपासून देशी-विदेशी दारूच्या किमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. सर्वसामान्य माणसाला विदेशी दारू प्यायची असेल तर त्याचा रोजजा खर्च ५०० रुपयावर गेला आहे. पहिले एका माणसाला दारू पिण्यासाठी किमान २०० ते ३०० रुपये खर्च यायचा, परंतु यात दुप्पट वाढ झाल्याने ती सर्वसामान्यांना परवडण्यासारखी राहिलेली नाही. तसेच मनपाने दारूवर सहा टक्के एलबीटी लागू करण्यात आलेला आहे. हा कर ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जातो. त्यामुळेही बीअर बार व परमीटरूममध्ये दारूच्या किमतीत भरमसाट वाढ करण्यात आलेली आहे.