सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी लोकसभा मतदारसंघाप्रमाणे जिल्हा विभाजनास पाठिंबा व्यक्त करत, विभाजनाच्या लढय़ाची ‘लाइन ऑफ अ‍ॅक्शन’ ठरवण्यासाठी येत्या आठ दिवसांत सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा परिषदेसह विविध ठिकाणी जिल्हा विभाजनाचा ठराव करण्याचा, तालुकानिहाय बैठका घेण्याचा निर्णयही झाला. विभाजनाच्या लढय़ात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनाही सहभागी करून घेण्याचे ठरले.
लालटाकी भागातील गुरुकुल सभागृहात सोमवारी झालेल्या जिल्हा विभाजन कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अनिल राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, मनसेचे नेते वसंत लोढा, जनता दलाचे भगवान बांदल, भाकपचे सुधीर टोकेकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीचे निमंत्रक व प्रदेश काँग्रेसच्या योजना संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी पालकमंत्री मधुकर पिचड, भाजपचे आमदार राम शिंदे, शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनीही विभाजनास पाठिंबा दिल्याची माहिती दिली.
देशमुख यांनी प्रास्ताविकात काँग्रेसच्या जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार गांधी यांनी नागरिकांच्या सोयीसाठी एक जिल्हा एक लोकसभा व एक तालुका एक विधानसभा करा अशी मागणी केली. पाचपुते यांनी विभाजनासाठी पक्षीय अभिनिवेष, वाद बाजूला ठेवत लढय़ासाठी संघटित ताकद उभी करण्याचे आवाहन केले. विभाजन व्हावे, अशी उत्तरेतील नेत्यांची इच्छा आहे, मात्र त्यांना बोलता येत नाही, लढय़ात सहभागी झाल्यास दबाव येण्याची शक्यता आहे, पक्षाने रोखले तरी विभाजनासाठी राजीनामा देण्याची तयारी हवी, असे ते म्हणाले. आमदार कर्डिले यांनी पाठिंबा देताना लोकसभा निवडणुकीपूर्वी विभाजन झाले तर सत्ताधाऱ्यांचे अभिनंदन करू, नाही तर राजकारण केले असे समजू, असे स्पष्टपणे सांगितले. लढय़ासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. आमदार राठोड यांनी विकासासाठी विभाजन आवश्यकच असल्याचे सांगत त्यासाठी विधानसभेतही आवाज उठवू असे आश्वासन दिले.
लोढा, डी. एम. कांबळे, राजेंद्र फाळके, शंकरराव घुले, कॉ. सुधीर टोकेकर, विक्रमसिंह पाचपुते, संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, भगवानराव बांदल, अ‍ॅड. शिवाजीराव काकडे पाथर्डी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख, ऊसतोडणी कामगारांचे नेते गहिनीनाथ थोरे, बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादीचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष काकडे, काशिनाथ दाते, प्रताप ढाकणे, उद्योजक हरजितसिंग वधवा, शारदा लगड, राजेंद्र कोठारी, शिवाजीराव गजभिव आदींनी पाठिंबा व्यक्त केला. उबेद शेख यांनी सूत्रसंचालन केले.
 तेलंगणाची प्रेरणा
अनेक वक्त्यांनी तेलंगणाप्रमाणे आंदोलन उभारण्याची सूचना केली. मागणीचा दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत अशी सूचना करताना कर्डिले म्हणाले, की आम्ही विरोधी पक्षांनी आधी राजीनामे दिले तर तुम्ही पेढेच वाटाल. सत्ताधाऱ्यांनी दिले तर दबाव येतो, तुमचे नाही ऐकले तर आम्ही राजीनामे देऊच. आधीच कर्डिले जिल्हा बँक चालवतात म्हणून पवारसाहेब व अजितदादांकडे तक्रारी झाल्या, कारखानदार बेकायदा व्यवहार करतात म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लक्ष घालावे लागते.