आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेने बेटी बचाव हे अभियान ग्रामीण भागापर्यंत पोहोचविले असले तरी समाजाच्या उच्च वर्गात सुद्धा स्त्री भ्रूणहत्येची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. यासाठी वैद्यकीय व्यवसायातील सर्वानी या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
यशवंत स्टेडियम येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने ‘मुबारक हो बेटी हुई है’ या अभियानांतर्गत बेटी बचाव जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटक म्हणून अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या. उपमहापौर मुन्ना पोकुलवार, इग्नूचे संचालक डॉ. शिवसरण, नगरसेवक संदीप जोशी, शिक्षण सभापती चेतना टांक, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, आऊटस्टीक गायनॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सहारे, लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल राजे मुधोजी भोसले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष अरुप मुखर्जी आणि अलका मुखर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्त्री भ्रूणहत्या ही समस्या सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारी आहे. म्हणून आपण हाती घेतलेल्या बेटी बचाव आंदोलनाला माझे संपूर्ण सहकार्य असून यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, स्त्रियांना जन्म घेण्याचा अधिकार आहे. त्यांना सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. पण आज त्यांचा अधिकारच नाकारला जातोय. स्त्री भ्रूणहत्या ही बेकायदेशीर आहे. म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांच्या विरोधात मी कठोर लढाई लढू इच्छिते आणि यासाठी मला तुम्हा सर्वाची साथ अपेक्षित आहे.
समाजात महिलांना कायम दुय्यम स्थान दिल्या जाते. मात्र, आज महिला सर्व क्षेत्रामध्ये उच्च पदावर विराजमान आहे. महिलांना त्यांची प्रगती करण्यासाठी आई- वडिलांचे प्रेम- प्रोत्साहन, सर्व श्रेत्रात समान संधी आणि पुढे जाण्यासाठी चांगले वातावरण मिळाले तर महिला पुरुषांपेक्षा निश्चितच चांगली कामगिरी करू शकतात, असेही त्या म्हणाल्या. अरुप मुखर्जी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. या कार्यक्रमास शहरातील अनेक शाळेतील मुली मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.