अॅलर्जीच्या आजारांमध्ये वाढ!
सध्याची थंडी आजारांसाठी ‘पोषक’
हिवाळ्यात अनेकांना शिंका, खोकला, प्रसंगी फुफ्फुसामध्ये जडपणा जाणवून श्वास घ्यायला त्रास होण्याचे आजार होतात. या आजारांमागे केवळ वाढलेली थंडी हे एकमेव कारण नाही, तर डोळ्यांना पटकन न दिसणारे सूक्ष्म कीटकही या आजारांचे मूळ ठरू शकतात. पुण्यातही या कीटकांमुळे अर्थात ‘माईट्स’ मुळे अॅलर्जीस संवेदनशील असणाऱ्या व्यक्तींना असा त्रास वाढला आहे.
ज्येष्ठ वायुजीवशास्त्रज्ञ डॉ. सुदाम जोगदंड गेली काही वर्षे माईट्समुळे होणाऱ्या अॅलर्जीवर संशोधन करीत आहेत. पुण्यात कोणत्या भागात कोणत्या माईट्स सापडतात आणि त्या कोणत्या अॅलर्जिक आजारांना कारणीभूत ठरू शकतात याबाबतचे हे संशोधन आहे.
या छोटय़ा कीटकांचा एक प्रकार ‘हाऊस डस्ट माईट्स’ घरात सर्रास आढळतो. त्यांची संख्या उन्हाळ्यात नगण्य असते. त्या दिवसांची अंडीही कवचात सुरक्षित राहून धुळीत पडून राहतात. पावसाळ्यात अंडय़ामधील कीटकांची वाढ पूर्ण होऊन ते बाहेर येतात आणि घरात माईट्सची संख्या एकदम वाढते. या माईट्सचा आकार एक मिलिमीटरपेक्षाही खूप लहान असल्याने त्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. घरात आढळणाऱ्या माईटस् थंडीत तापमानात घट झाल्याने तसेच हवेतील दमटपणा कमी झाल्याने त्या मरतात. माईट्सच्या मृत शरीराचे भाग, शरीरावरील तंतू आणि त्यांनी उत्सर्जित केलेली द्रव्ये धुळीत मिसळतात. हे पदार्थ अॅलर्जीस कारणीभूत ठरणारे असतात. केर काढल्यावर, गादी किंवा चादरी झटकल्यावर धूळ घरभर उडते. पंखा किंवा वातानुकूलित यंत्रणा सुरू असल्यास धूळ चटकन खाली बसत नाही.
ही धूळ श्वासावाटे फुफ्फुसात गेल्यामुळे
संवेदनशील व्यक्तींना अॅलर्जीचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते.
अॅलर्जिक आजारांपैकी ४४ टक्के आजारांचा प्रादुर्भाव केवळ माईट्समुळे होत असल्याचे जोगदंड यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. जगात आतापर्यंत माईट्सच्या ३६ प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत. जोगदंड यांच्या पुण्यातील संशोधनात हाऊस डस्ट माईट्स व्यतिरिक्त ‘पोल्ट्री माईट्स’, ‘रॅट माईट्स’, ‘ड्रोसोफिला कल्चर माईट्स’ आणि ‘कोकोनट ट्री माईट्स’ अशा चार प्रजाती सापडल्या आहेत.
कोणत्याही अन्नावर जिवंत राहण्याची क्षमता माईट्सकडे आहे. काळाच्या ओघात बदलत्या वातावरणाशी कसे जुळवून घ्यायचे हेही त्यांच्या अंगवळणी पडले आहे. घराबाहेर आढळणाऱ्या काही माईट्स आता घरातही आढळू लागल्या आहेत. पूर्वी पोल्ट्रीत सापडणाऱ्या ‘डॉर्मेनिसस गॅलिनी’ आणि ‘चिलॅटस इरूडेट्स’ या माईट्सच्या प्रजाती आता घरात शिरल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अॅलर्जीस संवेदनशील
असणाऱ्या व्यक्तींसाठी माईट्सचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे.
उष्ण कटिबंधातही अॅलर्जी वाढली
भारतात अॅलर्जिक आजारांच्या प्रादुर्भावात वाढ झाली असून, पंधरा वर्षांपूर्वी आठ-दहा टक्के असलेले हे प्रमाण आता वीस ते तीस टक्क्य़ांच्या पुढे गेले आहे, अशी माहिती ज्येष्ठ वायुजीवशास्त्रज्ञ डॉ. एस. टी. टिळक यांनी दिली आहे. पूर्वी अपवादानेच दिसणाऱ्या त्वचारोग, दमा, बालदमा यासारख्या अॅलर्जीचे प्रमाणही आता वाढले आहे. आता शीत कटिबंधाप्रमाणेच उष्ण कटिबंधातही या माईटस्मुळे होणाऱ्या अॅलर्जीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, असेही टिळक यांनी सांगितले.