भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे शुक्रवारी दुपारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी व घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. दोन महिन्यांनी होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुका बघता अमित शहा यांच्या उपराजधानीमधील भेटीला वेगळे महत्त्व आहे. राज्यातील कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीविषयी चर्चा करतील, प्रसार माध्यमांशी बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या सर्व गोष्टींना त्यांनी फाटा देऊन कुठलीही बैठक न घेता प्रसार माध्यमांशीही बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. अमित शहा यांनी दुपारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महालातील कार्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहसरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याशी विविध विषयांवर बंदद्वार चर्चा केली. या भेटीत त्यांनी मौन बाळगले असले तरी बरेच राजकीय संकेत ते देऊन गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि महापौर अनिल सोले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विमानतळावर आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अभिवादन केले आणि गाडय़ांचा ताफा दीक्षाभूमीकडे निघाला. शहा यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. तत्पूर्वी, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अजय संचेती, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, माजी महापौर अर्चना डेहनकर यांनीही त्यांचे स्वागत होते. यावेळी ‘भारत माता की जय’ व ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’, अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम, महाराष्ट्र भाजप सेलचे अध्यक्ष संदीप गवई यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दीक्षाभूमी परिसरात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानी शहर व जिल्ह्य़ातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांच्यासह आमदार पंकजा मुंडे-पालवे, विनोद तावडे, उपेंद्र कोठेकर, गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, सुधीर पारवे, सुधाकर देशमुख, नाना शामकुळे आदी नेते उपस्थित होते. फडणवीस यांच्याकडे त्यांनी भोजन करून रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधींचे दर्शन घेतले. त्यानंतर महालातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहसरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्याशी त्यांनी जवळपास दीड तास बंदद्वार चर्चा केली आणि तेथून ते दिल्लीला रवाना झाले.
अमित शहा यांच्या नागपूर भेटीबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीच्या निमित्ताने ते नागपूरला आले. राज्यात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात त्यांच्याशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही किंवा बैठकही घेण्यात आली नाही. शहरातील आणि जिल्ह्य़ातील प्रमुख कार्यकत्यार्ंना त्यांची भेट घ्यायची असल्याने ते माझ्या निवासस्थानी दोन तास होते. मात्र, निवडणुकीविषयी त्यांच्याशी काहीही चर्चा झाली.