राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफुस टोक गाठू लागली असून कोकणात नारायण राणे यांच्या प्रचारात राष्ट्रवादीने ‘खो’ घातला असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांच्या प्रचारातून काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक गायब झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील काही काँग्रेस नगरसेवकांनी परांजपे यांना ठेंगा दाखवीत थेट गावाकडे प्रयाण केल्याचेही वृत्त असून ठाणे जिल्ह्य़ातील इतर लोकसभा मतदारसंघांतही काँग्रेस-राष्ट्रवादीत अशाच प्रकारचे असहकाराचे राजकारण सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीत संघटनात्मक पातळीवर सावळागोंधळ असताना कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही परांजपे यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडली आहे. त्यामुळे आघाडीची एकत्र ताकद परांजपे यांच्यामागे उभी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सातत्याने सुरू असून सध्या तरी काँग्रेस पक्षातील काही नगरसेवकांच्या असहकारामुळे परांजपे यांच्यापुढील अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. परांजपे यांनी खासदार असताना आम्हाला त्यांनी मदतीचा हात कधीच पुढे केला नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी काँग्रेस नगरसेवकांकडून मांडण्यात येत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे काही नगरसेवक शहरात फिरण्यापेक्षा परगावी देवदर्शन तसेच काही जण गुरूच्या दर्शनासाठी गेल्याचे वृत्त आहे. काही नगरसेवक आपल्या गावाकडील उमेदवाराच्या प्रचारासाठी निघाले आहेत. परांजपे यांच्या प्रचारात काँग्रेसचे नगरसेवक असतात, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत असला तरी खासगीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी प्रचारात नसल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये अदलाबदल करण्यात आली. कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद पश्चिमेतील नगरसेवक संजय पाटील यांना देण्यात आले. भिवंडी लोकसभेत हा भाग येतो आणि राष्ट्रवादीने कल्याण पूर्वेतील अभिमन्यू गायकवाड यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेऊन निवडणुकीच्या तोंडावर परांजपे यांना कल्याण पूर्वेत एकाकी पाडले असल्याचे चित्र आहे. या सगळ्या प्रकरणात रुसलेले, फुगलेले राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते प्रचारापासून दूर असल्याचे सांगण्यात येते.