नियमबाह्य़रित्या प्रवेश देण्यात आल्यामुळे नागपूर विद्यापीठाने प्रवेश रद्द केलेल्या पदव्युत्तर संगणक शास्त्र व उपयोजन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी करणार आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काँप्युटर सायन्स अँड अ‍ॅप्लिकेशन (पीजीडीसीएसए) या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांने बी.एस्सी. ची परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह गणित आणि इतर निर्धारित विषयांपैकी कोणतेही दोन विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाच्या अध्यादेश क्र. २४ मध्ये नमूद केले आहे. परंतु महाविद्यालयांनी या नियमाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.
नागपूर विद्यापीठाचे इंटर इन्स्टिटय़ूशनल काँप्युटर सेंटर (आयआयसीसी, कमला नेहरू, पांडव आणि भंडारा येथील एका महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जातो. संबंधित विद्यार्थी विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांसाठी अर्ज भरण्यासाठी गेले असता विद्यापीठाने त्यांना त्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याचे कळवले. त्यामुळे ऋचा जैन हिच्यासह आठ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागितली आहे.
महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले सर्व निकष आम्ही पूर्ण केले असल्याने आमचे प्रवेश रद्द करण्याची विद्यापीठाचे कृती एकतर्फी आहे. त्यामुळे आम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची, तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने या याचिकेवर विद्यापीठाला २५ फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्यास सांगितले असून, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी दिली आहे. त्या दिवशी याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे.