कोल्हापुरातील कलेला गुणात्मक जागतिक दर्जा आहे. इथल्या कलाकारांच्या कलाकृती व्यापकस्तरावर पोहोचण्यासाठी मुंबईत कला महोत्सव घेऊन मार्केटिंग केले जाणार आहे. या उपक्रमाला जनतेने पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने कला महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक बापूसाहेब जाधव यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर १०० हून अधिक कलाकृतींचे बुकिंग झाल्याने करवीर नगरीतील कलाकारांचा हुरूप वाढलाआहे.
दसरा चौक मैदानामध्ये कोल्हापूर कलामहोत्सव २०१२ ला प्रारंभ झाला. त्याचा शानदार उद्घाटन समारंभ शाहू सभागृहात पार पडला. कार्पोरेट टच मिळालेल्या कलामहोत्सवाला कोल्हापुरातील रसिकांनी मोठी उपस्थिती लावत दाद दिली.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरातील कलाकारांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, असा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या कला महोत्सवात विविध कलाकृतींच्या स्पर्धा, प्रात्यक्षिके याचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक वर्षी हा महोत्सव घेऊन कलाकारांना दाद दिली जाणार आहे.
यावेळी डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील, ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव, विलास बकरे, शिवाजी म्हस्के उपस्थित होते. स्वागत रियाज शेख तर प्रास्ताविक प्रशांत जाधव यांनी केले. अस्मिता जगताप, अनंत खासबासदार यांनी मनोगत व्यक्त केले.
कलाकृती विक्रीसाठी दसरा चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला असून १०० स्टॉल्स विक्री करण्याकरिता उभे करण्यात आले आहेत. ७५ स्टॉल्स्वर चित्र, शिल्पकारांच्या कलाकृती विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. १० स्टॉल्स्वर कलाविषय पुस्तके, रंग साहित्य, स्टेशनरी साहित्य यांचा समावेश आहे. तर ५ स्टॉल्स् जिल्ह्य़ातील कला महाविद्यालयांच्या माहितीसाठी राखीव आहेत. ५०० रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंतच्या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. गेल्या दिडशे वर्षांतील ३० महत्त्वाच्या कलाकृतींसह समकालीन १२५ चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. कलात्मक सजावटीबरोबरच बौध्दिक व आत्मिक सुख देणारा विविध कलाकृतींच्या एकत्रित दर्शनाची संधी रसिकांना मिळालेली आहे. ५ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.