पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा खून करणारा आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २२) याला सोमवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दर्शन रोहित शहा या खून झालेल्या बालकाच्या शेजारीच चांदणे हा राहात होता. तब्बल १८ दिवसांनंतर या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
२५ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी २६ डिसेंबर रोजी देवकर पाणंद येथे राहणाऱ्या दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचा अपहरण करून खून करण्यात आला होता. खुन्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते. अखेर या प्रकरणाचे गूढ उघडकीस आले असून योगेश चांदणे याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव म्हणाले, योगेश हा १२ वी नापास झालेला युवक आहे. तो कसलाही कामधंदा करीत नव्हता. चैनीची सवय असल्याने त्याच्या अंगावर दीड लाख रुपयांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याने २० दिवसांपूर्वी दर्शनचे अपहरण करण्याच्या डाव रचला होता. त्यासाठी चिठ्ठीही त्याने लिहिली होती.
२६ डिसेंबर रोजी दर्शन हा कॉलनीतील एका बाकडय़ावर बसला होता. योगेश चांदणेने संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला भूलथापा देऊन त्याला तेथून हलविले. त्यानंतर दोघेजण राऊत यांच्या उसाच्या फडात गेले. चांदणेने दर्शनचे तोंड दाबले. तो बेशुध्द झाला. त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला खांद्यावर घेऊन चांदणेने दर्शनला विहिरीत ढकलून दिले. खून कसा केला याचे प्रात्यक्षिक चांदणे याने पत्रकारांसमोर करून दाखविले.
चांदणे हा शहा कुटुंबीयांच्या जवळच राहात होता. शहा कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती त्याला माहिती होती. दर्शनचे अपहरण झाल्यानंतर त्यासाठी मागितलेले २५ तोळे सोने दर्शनची आई आपल्याकडेच देईल, असा त्याला विश्वास होता. हे दागिने घ्यायचे आणि जवळच असलेल्या बांधकामाच्या क्रशरमध्ये ठेवल्याचा बहाणा करून ते स्वतकडे ठेवायचे, असे त्याचे नियोजन होते. ज्या क्रशरमध्ये सोने ठेवायचे होते ते त्याच्या घराच्या खिडकीतून स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलीस व अन्य कोणाच्या हालचाली, नजर आहे का याचा त्याला अंदाज येणार होता. मात्र त्याचा हा डाव पूर्णत फसला. दर्शनला केवळ पळवायचे होते. जिवे मारायचे नव्हते. मात्र तोंड दाबताना त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला अशी कबुली चांदणे याने पोलिसांना दिली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक महेश सावंत, राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे व सहकाऱ्यांनी केला.