छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘जाणता राजा’, भगवान श्रीकृष्ण यांच्या कृष्णलीलांवरील ‘संभवानी युगे युगे’ यानंतर शिर्डीच्या साईबाबा यांच्या चमत्कारावर आधारित ‘सबका मालिक एक है’ या हिंदी महानाटय़ाला नवी मुंबई आणि पनवेलकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नांदेड, परभणी व नायगाव येथील यशस्वी प्रयोगानंतर पनवेलच्या कर्नाला स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या मैदानावार शनिवार-रविवारी झालेल्या या महानाटय़ाच्या प्रयोगाला ५० हजारापेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महानाटय़ात साईबाबांच्या चमत्कारांबरोबरच ‘मुलगी वाचवा’  यासारखा संदेश बाबांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
विघ्नहर्ता प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या या महानाटय़ात साईबाबा यांच्यासाठी सुप्रसिद्ध कलाकार व साईफेम सुधीर दळवी यांचा आवाज देण्यात आल्याने नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात आले आहे. सहा हजार चौरस फुटाचा भव्य स्टेज आणि १८२ कलाकारांच्या बळावर हा प्रयोग उत्तरोत्तर अधिक रंजक आणि मोहक होत असल्याचे दिसून येते. साईबाबा यांचे सर्वप्रथम शिर्डीत त्या निंबाच्या झाडाखाली येणे, त्यानंतर तीन वर्षे गायब होणे या दृश्यांनी या महानाटय़ाची सुरुवात करण्यात आली असून ही सर्व कहाणी महाभारताच्या पाश्र्वभूमीवर मै समय हूँ, मै शिर्डी हूँ असे सांगत शिर्डी शहराने कथन केली आहे. त्यानंतर चाँद भाईची घोडी हरवणे व ती बाबांच्या इशाराने सापडणे, त्यांनी भाच्याच्या लग्नाचे आमंत्रण देऊन पुन्हा शिर्डीत नेणे आणि तेथेच म्हाळासपती यांनी खंडोबाच्या मंदिरासमोर ‘आयो साई’ अशी हाक मारणे यांसारख्या प्रसंगांचे चित्रण हुबेहूब करण्यात आले आहे. त्यासाठी खरोखरची घोडी, मुस्लिम लग्नाची वरात व्यासपीठासमोर दाखविण्यात आली आहे. दिवाळी पहाटेला तेल नसल्याने संपूर्ण द्वारकामाई दिव्यांनी उजळून टाकण्याचा बाबांचा चमत्कार दाखविताना दिग्दर्शकाने आपले सर्व कसब वापरले असून तंत्राचा चांगला उपयोग केला आहे. या वेळी रंगमंचाच्या मागे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे काही क्षण मैदानात दिवाळी साजरी झाल्याचे दृश्य होते.
 श्यामलाल देशपांडे यांना हरिजनांसाठी शाळा सुरू करण्यास सांगणे आणि एका भक्ताची मुलगी आगीत पडल्यानंतर तिला वाचविणे या दृश्यात बाबांच्या ‘बेटी बचाओ’चा संदेश देण्यात आला आहे.
 गणेश सहस्रबुद्धे यांना दासगणू पदवी देऊन लिहिण्यास प्रवृत्त करणे, ब्रह्मज्ञान देणे, नानासाहेब चांदोरकराच्या मुलीला विभूती पाठविणे, यांसारख्या दृश्यांनी प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवल्याचे दिसून आले. दासगणूना काशी-प्रयाग येथेच आहे हे सांगण्यासाठी रंगमंचावर पाण्याची धार प्रकट होणे, श्रीकृष्ण, विठोबा, अक्कलकोटचे महाराज शिर्डीतच आहेत हे सांगण्यासाठी त्या देवांची पात्रं काही क्षणात रंगमंचावर अवतरणे यात दिग्दर्शकाने खंड पडू दिलेला नाही. बायजाबाई यांचे देहावसान आणि बाबांची ७२ तासांची समाधी यासारख्या दृश्यांनी प्रेक्षकांच्याही डोळ्यांत पाणी तरळले. सरतेशेवटी बाबांची समाधी आणि सोनेरी झालेली शिर्डी दाखवून या महानाटय़ाचा प्रयोग संपविण्यात आला आहे.
संपूर्ण जगात बाबांचे भक्त असून देशात या महानाटय़ाचे प्रयोग व्हावेत या उद्देशाने हा प्रयोग हिंदीत करण्यात आला आहे. यापुढे लेजर शोने बाबा आकाशातून आशीर्वाद देत असल्याचे दृश्य चित्रित करावयाचे आहे, असे विघ्नहर्ताचे दीपक परुळेकर यांनी सांगितले.