औरंगाबाद-जालना रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात करारातील अटींचा भंग झाल्यामुळे या रस्त्यावरील दोन्ही पथकर वसुली नाके सोमवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले. करारातील अटींमधील उर्वरित कामे पूर्ण होईपर्यंत दोन्ही पथकर वसुली नाके बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद विभागाच्या मुख्य अभियंत्यांना गेल्या २ फेब्रुवारीला दिले होते.
शिवसेनेचे बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जालना-औरंगाबाद रस्त्याची दुर्दशा, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अपूर्ण कामे, विभागाच्या सूचनांकडे कंत्राटदारांकडून दुर्लक्ष, अधिसूचनेस २ वर्षे मुदतवाढ, वाढता जनक्षोभ, एजन्सीकडून करारभंग, रस्त्यावर वारंवार अपघात आदी कारणे देऊन विभागाने या रस्त्यावरील लाडगाव व नागेवाडी येथील दोन्ही पथकर नाक्यांवरील वसुली थांबविल्याचे आदेश दिले. करारातील सर्व अटी व शर्तीची पूर्तता होईपर्यंत दोन्ही पथकर वसुली नाके बंद राहणार आहेत.
पथकर वसुली स्थगित केल्याबद्दल शिवसेना व भाजपच्या वतीने नागेवाडी टोलनाक्याजवळ सकाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमदार सांबरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, भाजप खासदार रावसाहेब दानवे, भाजप जालना शहर अध्यक्ष वीरेंद्र धोका यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.