राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाने सप्टेंबरची राज्यातील जिल्हय़ांची उत्पन्नाची क्रमवारी जाहीर केली. त्यात उस्मानाबादने राज्यात चौथा क्रमांक मिळविला. या अगोदर उस्मानाबादचा अठरावा क्रमांक होता. दरम्यान, राज्यातील सहा प्रादेशिक विभागांत औरंगाबादने बाजी मारली.
महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे उस्मानाबादचे जीवनराव गोरे यांनी हाती घेतल्यानंतर कारभारात मोठी सुधारणा होत आहे. योग्य नियोजनानुसार प्रवासी सेवा देऊन आर्थिक उत्पन्नातही भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यातून उस्मानाबाद विभागाने अठराव्या क्रमांकावरून चौथा क्रमांक मिळविला. महामंडळाचे राज्यात ३० विभाग आहेत.
प्रत्येक महिन्यात मूल्यांकन करून त्यास क्रमांक दिला जातो. प्रति किलोमीटर उत्पन्न, खर्च, वाहनताफा वापर, रद्द किलोमीटर, इंधनाचा प्रति किलोमीटर वापर, टायर वापर, अतिकालिक भत्ता, अपघात दर आदी बाबी विचारात घेऊन मूल्यांकन केले जाते. त्यात बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर, तर औरंगाबाद, बुलढाणा व उस्मानाबाद असा क्रम आहे. राज्यभरात सहा प्रादेशिक विभाग असून औरंगाबाद विभागाने प्रथम क्रमांक पटकावला.