उरण नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सागर आडतराव या रिक्षावाल्याच्या मुलाने दहावीला ९० टक्के गुण मिळविल्यानंतर त्याला पुढील शिक्षण घेणे कठीण होते. घरातील आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने व त्याचवेळी रिक्षाचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनाही आजाराने ग्रासल्याने घर चालविणेही कठीण बनले होते. अशा वेळी उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उरणच्या या बुद्धिमान विद्यार्थ्यांचे स्वप्न साकारण्यासाठी हात पुढे केला आणि बघता बघता लाखो रुपयांचा निधी जमा झाला. उरणमधील जनतेच्या सहकार्यामुळे सागरने पुढील शिक्षण पूर्ण केले. त्याला गोदरेजसारख्या नामांकित कंपनीत नोकरीही लागली. याच मुलाने आता एमटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच वेळी त्याने आपल्याला समाजाने केलेल्या मदतीची जाणीव ठेवत समाजाचे ऋण फेडण्यासाठी उरणमधील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचाही निर्धार व्यक्त केला असून मागील चार वर्षांपासून तो अशी मदत करीत आहे.
कोकणातून येऊन उरण शहरात आलेल्या आडतराव कुटुंबाने आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. सागर हा मुलगा लहानपणापासूनच हुशार होता. त्याला त्याच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनीही वेळोवेळी मदत केली. दहावीला असताना त्याने आपली चुणूक दाखवीत ९० टक्के गुण मिळविले. त्याचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न होते. मात्र ते साकार करण्याची त्याची आर्थिक ताकद नव्हती.
उरणमधील नागरिक संतोष पवार यांना सागरची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उरणमधील दानशूर नागरिकांना एकत्रित करून सागरचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. सागरच्या शिक्षणासाठी समितीची स्थापना झाली आणि उरणच्या सर्वसामान्य जनतेने दीड लाखाची अपेक्षा असताना तीन लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतूनच सागरचे इंजिनीअरचे स्वप्न साकार झाले. जनतेच्या अपेक्षेनुसार सागरने बारावीतही घवघवीत यश संपादित केले. इंजिनीअरच्या प्रत्येक वर्षी अव्वल स्थान पटकावले. याच जोरावर शिक्षण सुरू असतानाच त्याला गोदरेजसारख्या कंपनीत नोकरी मिळाली. चार ते पाच लाख रुपयांचे पॅकेज मिळाल्यानंतरही हवेत न जाता त्याने आपल्या कमाईतील काही निधी आपल्यासारख्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात त्याने दोन वर्षांपूर्वी अशाच एका मुलीच्या शिक्षणाला मदत करून दिली. सागरने आता एमटेकसाठी प्रवेश घेतला असून याहीपुढे तो गरजवंत हुशार विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे त्याने सांगितले.