News Flash

पनवेलमधील रिक्षा मीटरसक्ती गारठली

कामोठे वसाहतीमध्ये एनएमएमटीची बससेवा सुरू झाली मात्र पनवेल तालुक्याच्या उर्वरित परिसरात तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे कधी सुरू होणार हा प्रश्न आहे.

| January 14, 2015 07:22 am

कामोठे वसाहतीमध्ये एनएमएमटीची बससेवा सुरू झाली मात्र पनवेल तालुक्याच्या उर्वरित परिसरात तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे कधी सुरू होणार हा प्रश्न आहे. मीटरसक्ती सुरू आहे, लवकरच तालुक्यातील रिक्षाचालक मीटरप्रमाणे धावतील ही पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाची बिरुदावली हिवाळ्याच्या थंड हवेत विरली आहे. प्रवाशांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या पनवेलच्या जनजागृती ग्राहक समितीने यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा पनवेलचे प्रादेशिक अधिकारी अरुण येवला यांची भेट घेतली आहे.
पनवेलमधील सुमारे पाच हजार तीन आसनी रिक्षाचालक व्यवसाय करतात. मीटरप्रमाणे धावत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. यासाठी परविहन आयुक्त महेश झगडे यांच्यापर्यंत पनवेलकरांची ही समस्या ग्राहक समितीने पोहचवली. सुरुवातीला झगडे यांनाही मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या पनवेल, नवी मुंबईत मीटरप्रमाणे रिक्षा धावत नाहीत ही बाब सत्य वाटली नाही. झगडे यांनी कोणतीही सबब न ऐकता प्रवाशांच्या पायाभूत हक्कासाठी पनवेलच्या रिक्षाचालकांवर मीटर सक्ती करण्याचे निर्देश प्रादेशिक अधिकारी येवला यांना दिले. येवला यांच्या संपूर्ण पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये डोळ्यात तेल घालून ही मोहीम राबवली. पनवेल रेल्वेस्थानक व पनवेल एसटी डेपो या ठिकाणांना केंद्रस्थानी ठेवून तेथे अधिकारी उभे करून तशी अंमलबजावणी झाली. मात्र आजचे या दोनही ठिकाणचे चित्र निराळे आहे. येथे उभे असलेले वाहतूक व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मीटर सक्ती करताना दिसत नाहीत. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी सुहासिनी बर्वे यांनी या मोहिमेचे नामकरण दिखाव्याची मोहीम असे केले आहे.

खांदेश्वर स्थानक ते कॉलनी बससेवेची मागणी
प्रादेशिक परविहन विभागात अपुरे मनुष्यबळ व वाहतूक पोलीस विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने ही कारवाई थंडावल्याचे बोलले जात आहे. दोनही विभागांच्या या असमन्वयी कारभाराचा फटका प्रवाशांच्या खिशाला रोज सोसावा लागत आहे. पाच प्रवासी बसल्याशिवाय रिक्षाचालक रस्त्यांवर रिक्षा चालवत नाहीत. प्रवाशांना रिक्षांशिवाय पर्याय नसल्याने त्यांनाही असाच बेकायदा असुरक्षित प्रवास करावा लागतो. एनएमएमटी प्रशासनाने खांदेश्वर रेल्वेस्थानक ते खांदा कॉलनी या पल्ल्यावर बससेवा सुरू केल्यास हजारो प्रवासी रिक्षाचालकांच्या जाचातून सुटतील. त्यांनाही कामोठे येथील प्रवाशांसारखा पर्याय मिळेल. तीन आसनी रिक्षाचालकांची यावर ओरड वेगळीच आहे. काही ठिकाणी तीन आसनी रिक्षा या मीटरप्रमाणे चालत असल्याचा दावा रिक्षाचालकांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र या रिक्षाचालकांचा विरोध टाटा मॅजिक व इको व्हॅनच्या बेकायदा प्रवासी वाहतुकीला आहे. या बेकायदा वाहतुकीमुळे तीन आसनी रिक्षांच्या व्यवसायावर परिणाम होतो, असे कळंबोली येथील तीन आसनी रिक्षांचालकांच्या महासंघाचे अध्यक्ष दिलीप सावंत यांचे म्हणणे आहे.

प्रवाशांची साथ हवी..
प्रवाशांनी पुढाकार घेऊन प्रवासापूर्वी रिक्षाचालकांना बोलीभाडय़ापेक्षा मीटरसक्तीचा हट्ट करावा. रिक्षाचालकाने याबाबत नकार दिल्यास त्वरित प्रादेशिक परिवहन विभागाच्या तक्रार निवारण केंद्रावरील ९००४६७०१४६ या क्रमांकाच्या मोबाइलवर एसएमएस करावा (या एसएमएसमध्ये नाव, पत्ता, तारीख, वेळ, तक्रारीचे स्वरूप असे नमूद करावे) तसेच कार्यालयीन वेळेत ०२२२७४२४४४४, ०२२२७४२५५५५ या दूरध्वनीवर थेट संपर्क साधावा. संबंधित रिक्षाचालकावर आरटीओचे पथक लगेचच कारवाई करतील. रिक्षाचालकावर दोन ते तीन वेळा मीटरसक्तीच्या कारवाईचे सातत्य राहिल्यास संबंधित रिक्षाचालकाला मीटरप्रमाणे व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 7:22 am

Web Title: auto rickshaw in navi mumbai
Next Stories
1 संक्रांतीसाठी बाजारपेठ गजबजली
2 नाइट क्रिकेटना चाप बसणार
3 महिलांना सिलेंडर उचलण्याच्या प्रथेची शिक्षा मोडीत
Just Now!
X